खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ३१ हजार विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती ; ३८ कोटी रुपये खात्यामध्ये जमा

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : राज्यातील हजारो गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरलेली राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) अखेर पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाली आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या विषयावर संसदेत शून्य प्रहर कालावधीत आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल ३८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती थेट ३१ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.
एनएमएमएस योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे केंद्र शासनाच्या एनएसपी (राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल) वर पाठवण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडथळे आणि प्रशासनिक विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी येत होत्या. ही बाब गंभीर असूनही प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मोठे नुकसान होत होते.
खासदार मोहिते-पाटील यांनी ही गंभीर बाब संसदेत मांडत शिक्षण मंत्रालयाकडे ठोस कारवाईची मागणी केली. त्यांनी संबंधित विभागाशी सतत संपर्क ठेवत हा विषय मार्गी लावला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर केंद्र सरकारने लक्ष घालून निधी वितरित करण्याची कार्यवाही पूर्ण केली.
विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांनी याबद्दल समाधान व्यक्त करत खासदार मोहिते-पाटील यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, राज्याचे शिक्षण आयुक्त राजेश क्षीरसागर यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना आधार व बँक खात्याचे सीडिंग वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणीशिवाय शिष्यवृत्तीचा लाभ वेळेवर मिळू शकेल.
ही शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार ठरत असून, योग्य वेळी निधी मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होण्यास हातभार लागतो, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.



