कोथळे, मेडद व शिंगोर्णी गावांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर; २ कोटी ३३ लाखांचा निधी मंजूर

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून कोथळे, मेडद आणि शिंगोर्णी या तीन गावांना नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांची मंजुरी देण्यात आली आहे. या उपकेंद्रांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी प्रत्येकी ६१ लाख १९ हजार रुपये, तर पंचायत समिती माळशिरस येथील BPHU (ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट) साठी ५० लाख रुपये, असा एकूण २ कोटी ३३ लाख ५७ हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.
या मंजुरीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून उपचारासाठी दूर जावे लागणार नाही. विशेषतः मौजे कोथळे येथील नागरिकांची ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. मोरोची येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागल्यामुळे तेथे जाण्या-येण्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
या उपकेंद्रांसाठी मंजुरी मिळवण्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बाबतीत आघाडीवर असून येथे आतापर्यंत १३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ७७ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, २ ग्रामीण रुग्णालये आणि १ उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उपकेंद्र माळशिरस तालुक्यात निर्माण झाली आहेत.
यामुळे माळशिरस तालुक्यातील रुग्णांची चांगली सोय होत असून रुग्णांच्या आरोग्याचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी मदत होत आहे. याशिवाय नवीन आरोग्य उपकेंद्रांची ही मंजुरी मिळाल्यामुळे ग्रामीण जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.