बँकेत हातचलाखीने 13,500 रुपयांची फसवणूक करणारा आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद ; नातेपुते पोलिसांची कामगिरी

महर्षि डिजीटल न्यूज /सागर खरात
नातेपुते : नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी बँकेत पैसे मोजत असलेल्या महिलेची हातचलाखीने 13,500 रुपयांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अवघ्या काही तासांत अटक केली.
फिर्यादी रेखा संतोष मोहिते (वय 40, रा. नातेपुते) या दुपारी 12:46 वाजता बँक ऑफ इंडिया, नातेपुते शाखेत त्यांच्या बचत खात्यातून 40,000 रुपये काढून मोजत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्याजवळ येऊन ‘माझ्याकडे फटक्या नोटांचे बंडल आहेत’ असे सांगून हातचलाखी केली. त्याने फिर्यादीच्या हातातील 40,000 रुपये घेऊन त्यातील 13,500 रुपये घेऊन फसवणूक केली व घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, पीएसआय विक्रम दिघे, पोलीस नाईक राकेश लोहार यांनी तत्काळ बँकेतील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी साताऱ्याच्या दिशेने दहिवडीमार्गे जात असल्याची माहिती मिळाल्याने दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार महेंद्र खाडे, गणेश खाडे, सहदेव साबळे यांनी नाकाबंदी करून आरोपीला ताब्यात घेतले.
नातेपुते पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे नाव सरफराज पिता मानू इराणी (वय 43, रा. सय्यद नगर, पुणे) असे असून, त्याच्याकडून गुन्ह्यातील 11,600 रुपये रोख व 50,000 रुपये किमतीची स्कूटी असा एकूण 61,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी सोलापूर, पुणे, सांगली, धाराशिव येथे विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 35/2025, भादंवि कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमित भगत करत आहेत.