माळशिरस तालुक्यातील १७ गावांना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुरी मिळावी ; आमदार उत्तमराव जानकर यांची पाणीपुरवठा मंत्र्यांकडे मागणी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातील १७ गावातील पाणीपुरवठ्याच्या सुधारित योजनांना जल जीवन मिशन २४-२५ अंतर्गत मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार उत्तमराव शिवदास जानकर यांनी जलसंपदा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार जानकर यांनी मंत्री महोदयांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात, तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गावांमध्ये पळसमंडळ, चांदापुरी, पठाणवस्ती, पिंपरी, शेंडेचिंच, मारकडवाडी, उंबरे दहिगाव, भांब, तरंगफळ, पिसेवाडी, जळभावी, मेडद, मांडवे, लोंढे मोहितेवस्ती, माळेवाडी बोरगाव, जांभूड, खळवे या गावांचा समावेश आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत या गावांमध्ये शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करून ग्रामस्थांना स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी आमदार जानकर यांनी लक्ष घातले असून याबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सदरच्या योजनांना मंजुरी मिळाल्यास गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.