Latest News

पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र कोणाचे? सोशल मीडियात वायरल होत असलेल्या फोटोमुळे पालकमंत्र्यांवर “हे राम” म्हणण्याची वेळ

महर्षि डिजीटल न्यूज

माळशिरस : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माळशिरस तालुक्यातील दौऱ्या दरम्यानच्या सत्कार समारंभा वेळचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून त्यांच्यासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्तींची उपस्थिती आढळून आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. विरोधकांबरोबरच भाजपातीलही एका गटाने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, पालकमंत्र्यांच्या सभोवती असे लोक का? ते कोणाचे कार्यकर्ते आहेत?  पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचा हेतू आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्यानंतर जयकुमार गोरे यांचा माळशिरस तालुक्यातील विविध भागात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान वेळापूर येथे एका कार्यक्रमात जयकुमार गोरे यांच्या सोबत मंचावर आणि सभोवताली काही तडीपारी व मोक्कासारख्या गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती दिसून आल्या, ज्या पूर्वी विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भात फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून, विरोधकांना टीकेची संधी मिळाली आहे.

संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती या माजी आमदाराच्या निकटवर्तीय असल्याची चर्चा असून पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालेल्या व नव्यानेच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळलेल्या जयकुमार गोरे यांना अशा माध्यमातून मुद्दामहून बदनाम करण्याचे षडयंत्र तर आखले जात नाही ना? अशा प्रकारची चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे.

ही संपूर्ण बाब जिल्ह्यात चांगलीच गाजत असून, भाजपातीलच एका गटांने या संपूर्ण प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा असून असे प्रकार घडत राहिल्यास पालकमंत्र्यांना लवकरच “हे राम” म्हणण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जयकुमार गोरे यांच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा असून, आगामी काळात या प्रकरणावर अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!