रोटरी क्लब अकलूजच्या दिनदर्शिकेचे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या हस्ते प्रकाशन
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : रोटरी क्लब अकलूजच्या २०२५ वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाला माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, रोटरी क्लबचे नवनाथ नागणे, केतन बोरावके, अजित वीर, मनोरमा लावंड, वनिता कोरटकर, हेमलता मुळीक, पोपट पाटील यांच्यासह मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने शेंडगे व मान्यवर सदस्य उपस्थित होते.
दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “रोटरी क्लब अकलूज सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. दिनदर्शिका हा केवळ वेळापत्रकाचा दस्तऐवज नसून, त्याद्वारे सामाजिक संदेश देण्याची संधीही उपलब्ध होते.”
रोटरी क्लबचे नवनाथ नागणे यांनी यावेळी रोटरीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमाची माहिती सांगितली. आगामी काळात शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आभार वनिता कोरटकर यांनी मानले.