Latest News

भूसंपादनाचा मोबदला अडकला ; पालखी महामार्ग रखडला, संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाबाबत राष्ट्रीय महामार्ग व भूसंपादन अधिकारी यांच्यात समन्वयाचा आभाव?

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी एक म्हण प्रचलित आहे. परंतु या म्हणीलाही मागे टाकत आता ‘सरकारी काम आणि सह वर्ष थांब’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्याला कारण म्हणजे माळशिरस तालुक्यातून गेलेला संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग. तब्बल सहा ते सात वर्षे झाली तरी पालखी महामार्गासाठी भूसंपादन झालेल्यांना अद्याप मोबदला मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर आली असून याचा परिणाम रस्त्याच्या पुर्णत्वावर होताना दिसत आहे.

पालखी सोबत येणार्‍या लाखो वैष्णवांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठोबारायाचे दर्शन सोयीस्कर व्हावे त्यांचा पायी मार्ग सुखकर व्हावा या हेतूने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर केला. यासाठी या महामार्गात भूसंपादित होणार्‍या जमिनींना अगदी चारपट रक्कम देण्याचे प्रयोजन करण्यात आले मात्र भूसंपादन करणारे अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारीच गोलमाल कारभार करणारे निघाल्याने महामार्गावरील प्रश्न मार्गी लागलेले दिसत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गाचे काम रखडले आहे. याचा परिणाम म्हणून वारकर्‍यांची वाट बिकट बनली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भूसंपादन प्रक्रियेमध्ये संयुक्त समिती नेमण्यात आली होती. यामध्ये कृषी, वनीकरण, सा बां विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूमी अभिलेख आणि राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकार्‍यांचा समावेश होता. पण या समितीमार्फत जमीन, घरे, विहिरी, झाडे आणि पाइप लाइन यांचे मूल्यांकन करताना जाणून बुजून त्रुटी ठेवण्यात आल्या. आर्थिक अमिषा पोटी अधिकार्‍यांनी हा सर्व खेळ खंडोबा केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात माळशिरस तालुक्यातील अकलूज ते तोंडले बोंडले हे अंतर 22 किलोमीटरचे आहे यापैकी अकलूज, माळीनगर, सवतगव्हाण, तांबवे, महाळुंग आदी गावातील अधिग्रहण होणार्‍यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने, काहींची झाडे, बोरवेल, घरे, विहिरी यांचा उचित मोबदला न मिळाल्याची प्रकरणे प्रलंबित असल्याने तसेच काहींचे थकित व्याजाची रक्कम न मिळाल्याने त्यांनी जागा रिकामी करून दिली नाही. त्यामुळे रस्ता तयार करताना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे पालखी महामार्गाचे काम काही ठिकाणी रखडल्याचे परिसरातील नागरिकांतून बोलले जात आहे. अधिकार्‍यांच्या या दुटप्पी व दुजाभाव करणार्‍या भूमिकेमुळे काही ठिकाणी पालखी महामार्गाचे काम रखडलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच वैष्णवांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काहींची व्याजाची रक्कम देण्याबाबत नॅशनल हायवेकडे मागणी करण्यात आली आहे परंतु नॅशनल हायवेकडून प्रतिसाद मिळालेला नाही. आमच्या लेवलला कोणाचाही मोबदला अडकलेला नाही. आणि मोबदला मिळाला नसल्यामुळे काम कोणी अडवले असल्याबाबत आम्हाला नॅशनल हायवेने अद्यापपर्यंत कळवलेले नाही. - विजया पांगारकर, प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अकलूज

या बाबत नॅशनल हायवेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एकंदरीतच नागरीकांच्या तक्रारी पाहता नॅशनल हायवेचे अधिकारी व भूसंपादन अधिकारी यांचे कार्यालय यांच्यामध्ये समन्वयाचा आभाव असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहेत. आणि याचा परिणाम मात्र महामार्गाच्या पूर्णत्वावर होत असल्याने वाहनचालकांचे मात्र हाल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!