अवैध धंद्याविरोधातला जुमानला नाही ठराव ; ग्रामस्थ घालणार वेळापूर पोलिस स्टेशनला घेराव?, ग्रामपंचायतींच्या ठरावांना वेळापूर पोलिसांकडून केराची टोपली
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : ग्रामसभा म्हणजे ग्रामीण भागातील लोकशाहीचा पाया असून अगदी संसदेप्रमाणेच ग्रामसभेला महत्वाचे मानले जाते. ग्रामसभेत होणार्या ठरावांना देखील संसदेत होणार्या निर्णयाप्रमाणे महत्व असते. परंतु याच ग्रामसभेत झालेल्या ठरावांना वेळापूर पोलिस मात्र केराची टोपली दाखवताना दिसत आहेत. यामुळे अनेक गावातील सरपंचासह ग्रामस्थही वैतागून गेले असून एकजुटीने पोलिस स्टेशनलाच घेराव घालण्याची तयारी गावकर्यांनी केली असल्याची चर्चा ऐकायला मिळू लागली आहे.
वेळापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या गावातील अवैध धंदे बंद करण्याबाबत अनेक ग्रामपंचायतींनी आपापल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत ठराव केले. त्या ठरावाच्या प्रती संबंधित पोलिस स्टेशनला देखील पाठवण्यात आल्या परंतु सदरच्या ठरावाला पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. ग्रामस्थांनी आता वेळापूर पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा निर्धार केला आहे.
ग्रामपंचायतीने गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात ठराव करून गावात अवैध दारू, मटका, जुगार व्यवसाय चालू आहेत. गावातील शाकरी मुले-मुली ये-जा करत असतात. महिला, नागरिकांना या अवैध धंद्याचा त्रास होत असल्याबाबत वेळापूर पोलिसांना कारवाईसाठी सूचना दिल्या होत्या.
मात्र तोंडी व लेखी दोन्ही सूचनांकडे दुर्लक्ष करत पोलिसांनी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप ग्रामस्थ करताना दिसत आहेत. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, गावातील अवैध मद्यविक्री, जुगाराचे अड्डे आणि इतर गैरधंदे यामुळे गावात अस्वस्थता पसरली आहे. वारंवार विनंती करूनही पोलिसांकडून कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थ आता एकत्र येऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आहेत.