अकलूज नगरपरिषदेचा स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात ; 1,95,000/- रू लाचेची केली होती मागणी
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : अकलूज नगरपरिषदेचा स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर अँटी करप्शन विभागाने 1,95,000/- रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी रंगेहाथ पकडले असून या प्रकारामुळे नगरपरिषदेत खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अँटी करप्शन विभागाची मोठी कारवाई मानली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकलूज नगरपरिषदेचे साफ-सफाई व इतर कामकाजाकरीता मनुष्यबळ पुरवठा करणार्या श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, बारामती या कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीनुसार कंपनीच्या वतीने विविध आस्थापनेशी समन्वय साधून टँकर भरणे, मनुष्यबळ पुरविणे, पत्रव्यवहार करणे, वेतनासाठी निधी प्राप्त करून घेणे इ. शासकीय कामे केली जातात. अकलूज नगरपरिषदेने शहरातील रस्ते, बाजारपेठा वाणिज्य गाळे, शौचालय साफ सफाई करणेकामी मनुष्यबळ पुरवठा करणेकरिता प्रसिध्द केलेले टेंडर आमच्या कंपनीला मंजूर झाले आहे.
त्यानुसार कंपनीने अकलूज नगरपरिषदेसाठी मनुष्यबळ पुरवठा केला होता. आमच्या कंपनीला टेंडर मंजुर झाल्यानंतर निविदा दर मंजुर करून वर्क ऑर्डर देताना नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक नितीन सिद्राम पेटकर वय 40 रा.बासलेगांव रोड, पिरजादे प्लॉट, अक्कलकोट ता.अक्कलकोट जि.सोलापूर यांनी आमच्याकडे कामगारांच्या मासिक वेतनाच्या बिलाच्या तीन टक्के रक्कम व वर्क ऑर्डर मंजुरीचे 1,50,000/- रूपये असे एकुण 1,95,000/- रूपये लाचेची मागणी केली आहे. यावरून लाचलुचपत पथकाच्या वतीने अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हि कारवाई अॅन्टी करप्शन चे पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधिक्षक शीतल जानवे/खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस निरक्षक गणेश पिगुवाले, पोलिस अंमलदार कोळी, पोलिस नाईक संतोष नरोटे, पोलिस हवालदार राहुल गायकवाड, यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.