राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गावात भाजप प्रेमी पोलीस; खुलेआम चालणार्या अवैध धंद्यामुळे जनता मात्र ओलीस ?वेळापुर पोलिस स्टेशन बाबत चर्चेला उधान
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : आपल्या गावातील संघर्षवादी नेता आमदार झाल्यामुळे आनंदात असलेल्या वेळापूर गावात मात्र वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. येथील पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस चक्क भारतीय जनता पक्षाच्या प्रेमात अखंड बुडालेले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदाराच्या गावातील जनता मात्र संबंधित अधिकार्याच्या ओलीस राहते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या आमदाराच्या गावात सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. गावातील पोलिसांवर भाजपच्या प्रभावाखाली काम करण्याचे आरोप होत असून, यामुळे गावातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे त्याला कारण म्हणजे संबंधित अधिकार्याने नुकतेच व्हाट्सअप वर ठेवलेले स्टेटस आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त महर्षी डिजिटल न्यूज ने या अगोदरच प्रकाशित केले आहे.
शासकीय कर्मचारी हे लोकसेवक असल्यामुळे ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला असणे उचित नाही. भारतीय संविधान आणि शासकीय सेवा नियमांनुसार, शासकीय कर्मचार्यांना राजकीय पक्षांशी जाहीरपणे संबंधित होण्यास किंवा त्यांचे समर्थन करण्यास मनाई आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे प्रशासनाची तटस्थता आणि लोकांचा विश्वास टिकवून ठेवणे.
परंतु याला अपवाद ठरत वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी एकांगी कारभार करत असल्याचे बोलले जात आहे. वेळापूर परिसरात खुलेआम हातभट्टीचा व्यवसाय व मटक्याचे जाळे गावभर पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या, परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. उलट, पोलिसांकडून अशा अवैध धंद्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या सगळ्यामागे राजकीय दबाव काम करत आहे. भाजपशी संलग्न काही नेते पोलिसांवर प्रभाव टाकत असल्यामुळे कोणत्याही अवैध धंद्यांवर कारवाई होत नसल्याची चर्चा परिसरात उघडपणे ऐकायला मिळत आहे. गावातील ही परिस्थिती पाहता गावचे रहिवासी असलेल्या आमदारांनी यावर तातडीने भाष्य करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सरकारने आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी ही या निमित्ताने करण्यात येत आहे.