जातीच्या बोगस दाखल्यावर नोकरी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन घेतलेले शासकीय लाभ वसूल करण्याची मागणी ; लक्ष्मण पिंगळे करणार उद्यापासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : कोळी महादेव या जातीच्या आधारे नोकरी मिळवून आपली सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडले असून शासनाची फसवणूक केलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्या सेवाकाळात घेतलेले शासकीय लाभ वसूल करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी उद्या दिनांक 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर निवृत्त पोलीस हवालदार लक्ष्मण पिंगळे हे उपोषण करणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती देताना निवृत्त पोलीस हवालदार लक्ष्मण पिंगळे यांनी सांगितले की, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार नारायण पुंडलिक परचंडराव यांनी पोलीस खात्यातील नोकरी मिळवण्यासाठी महादेव कोळी या जातीचा बोगस दाखला जोडला होता याबाबत आम्ही जात पडताळणी समितीकडे परचंडराव यांची सर्व खरी आणि खोटी कागदपत्रे सादर करून चौकशी करण्याची विनंती केली होती.
यावर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती च्या पुणे विभागीय कार्यालयाने सर्व कागदपत्रांची चौकशी व पडताळणी करून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार नारायण पुंडलिक परचंडराव हे कोळी महादेव, अनुसूचित जमातीचे नाहीत. त्यामुळे त्यांचा कोळी महादेव, अनुसूचित जमातीचा दावा अवैध ठरविण्यात येत असल्याबाबतचा आदेश निर्गमित केला होता. शिवाय अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० च्या कलम १० व ११ अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक व वेळापूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या होत्या.
परंतु दीड वर्ष उलटून गेले तरीही अद्याप परचंडराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत लक्ष्मण पिंगळे यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस व वेळापूर पोलीस स्टेशन यांच्या विरोधात निवृत्त पोलीस हवालदार लक्ष्मण पिंगळे यांनी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.