शरद पवार यांचा सत्कार व गाडीचे सारथ्य ; शिवतेजसिंह यांच्यावर खिळल्या नजरा, माढा विधानसभेच्या उमेदवारी बाबत चर्चेला उधाण
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघातून जनतेच्या आग्रहाचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आज शरद पवार यांचा केलेला सत्कार व त्यांच्या गाडीचे सारथ्य चर्चेचा विषय बनलेला पाहावयास मिळाले.
माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आज शरद पवार अकलूज येथे आले होते. माळेवाडी येथील हेलिपॅड वरून विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल या कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या गाडीचे सारथ्य केले. शिवाय व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा सन्मान शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघाचे जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून चर्चेत असणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची हालचाल वाढली आहे. गेल्या वर्षभरापासून शिवतेजसिंह यांनी माढा विधानसभा चार ते पाच वेळा पिंजून काढला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर माढा विधानसभा मतदारसंघातून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचा आग्रह वाढताना दिसत आहे.
मोहिते पाटील परिवाराचा शरद पवार यांच्याशी असलेला निकटचा संबंध आणि शिवतेजसिंह यांच्यावरील राजकीय विश्वास दाखवणारा हा प्रसंग अनेकांच्या नजरेत आला आहे. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या घटनेमुळे उत्साहाचे वातावरण आहे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघात आपली पकड अधिक मजबूत केली असून, आगामी निवडणुकीत त्यांचा उमेदवारीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय राजकीय वर्तुळात या घटनेचा अर्थ पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.