अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या विस्तारीकरण्यासाठी प्रयत्न करणार – शिवतेजसिंह मोहिते पाटील
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : सत्तेचा उपयोग गावच्या विकासासाठी करताना अकलूज मध्ये कोणतीही गोष्ट करताना पुढील 25 ते 30 वर्षांचा विचार केला जातो, अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या विस्तारीकरणाबाबतही सर्वांना विश्वासात घेऊन विकास करण्यात येईल असे आश्वासन अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अकलूज नगरपरिषद व मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवतेजसिंह मोहिते पाटील बोलत होते. यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्यासह ग्रामपंचयतीचे माजी सदस्य व विविध संघटनांचे पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना किशोरसिंह माने पाटील यांनी अकलूज गावचा सर्वधर्मसमभाव आबादित असून सामाजिक सलोखा राखणारे गाव म्हणून अकलूज कडे पाहिले जात असल्याचे सांगितले. आज वरच्या सर्व मिरवणुका शिस्तबद्ध व शांततेत पार पडल्याचा इतिहास असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी कायद्याचे पालन करत जयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यासाठी अकलूज नगरपरिषदेच्या वतीने शक्य होईल तेवढे सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.