Latest News

माढा विधानसभेच्या आग्रहासाठी “कार्यकर्त्यांचा मोर्चा” ; शिवतेजसिंहांनी टपरीवरच केली “चाय पे चर्चा”

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघा नंतर आता माढा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. “बदल हवा आमदार नवा” या टॅग लाईन खाली विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात समाज माध्यमावर रोष व्यक्त केला जात असून दुसरीकडे मात्र शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना आग्रह केला जात असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 53 हजाराचे मताधिक्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना माढा तालुक्यातील जनतेने चांगले डोक्यावर घेतले असून लहान मोठे कार्यक्रम, लग्न समारंभ, उद्घाटन समारंभ अशा कार्यक्रमांना शिवतेजसिंह यांना आग्रहाचे निमंत्रण देऊन हक्काने आमंत्रित केले जात आहे. शिवतेजसिंह यांचा या निमित्ताने वाढलेला माढा तालुका दौरा व दौऱ्याच्या माध्यमातून वाढलेला जनसंपर्क त्यांना माढा विधानसभा लढवण्यासाठी आग्रह करताना दिसत आहे.

नुकतेच माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे कार्यक्रमासाठी आले असताना करमाळा चौकात कार्यकर्त्यांनी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना थांबवून रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आग्रह केला. शिवतेजसिंह यांनीही त्यांना प्रतिसाद देत चहाचा आस्वाद घेतला दरम्यान शिवतेजसिंह यांना पाहतात परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी शिवतेजसिंह यांच्याकडे मोर्चा वळवला व आगामी माढा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला. 

माढा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांची झालेली एन्ट्री व त्यांना निवडणूक लढवण्यासाठी होत असलेला आग्रह आगामी काळात माढ्याची राजकीय समीकरणे बदलवणारा ठरेल अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!