तब्बल 19 वर्षांनंतर भेटले मित्र मैत्रिणी ; आठवणीत रंगला माजी विध्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
महर्षि डिजीटल न्यूज
मलोळी: आवडते मज मनापासुनी शाळा, लावी ते लळा जशी माऊली बाळा! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा त्या शाळेच्या आठवणी कधीही विसरल्या जात नाहीत. याच पार्श्वभूमीवर मळोलीच्या जनता विद्यालयात 2003-4 ला दहावीत असलेले माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. 5 मे 2024 रोजी शाळेमध्ये या स्नेहा मेळाव्याचे आयोजन केले होते.
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गेल्या चार महिन्यापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. सर्व विद्यार्थी तब्बल 19 वर्षानंतर एकमेकांना भेटले, त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेमध्ये प्रमुख पाहुण्यांचे, शिक्षकांचे, विद्यार्थी, विद्यार्थीनीचे शाळेच्या मुख्य गेटपासून हलगीच्या निनादात कार्यक्रम मंडपापर्यंत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी शाळेचे संस्थापक अध्यक्ष कै. जयसिंगराव नारायणराव जाधव उर्फ आबासाहेब तसेच हयात नसलेल्या सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी स्नेह मेळाव्याचे उदघाट्न संस्थेचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य श्री रणजीतसिंह(बापू)जाधव, शिरीष जाधव सर, राजेंद्र जाधव सर,अनंत जाधव यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर वर्गामध्ये बसून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची ओळख करण्यात आली. मनोरंजनात्मक खेळ म्हणून गाण्याच्या भेंड्या, हलगीच्या तालावर संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात या प्रकारचे खेळ खेळण्यात आले.
दुपारच्या सत्रात जेवणानंतर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आप आपला परिचय करून दिला. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
मनोगतामध्ये शाळेविषयी, गुरुजनांविषयी आपल्या मनामध्ये कायम आदर व सद्भावना असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ही भेट पुढील आयुष्यभर साठी प्रेरणात आणि उत्साहात येत राहील असे सांगितले. मनोगत व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांसह शिक्षक ही भावुक झाले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी आर जाधवसर ,एस एम मानेसर ,घाटगेसर, एच जी मानेसर, तेरखेडकरसर, गवळी सर, एसटी जाधवसर, बाबरसर, ढोबळेसर, सावंतसर, लवटे सर, या गुरुजनांचा व नामदेव शिंदे, अनंता जाधव, पांडुरंग कांबळे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हार फेटा श्रीफळ व श्रीगणेशमूर्ती, श्री विठ्ठल मूर्ती देऊन देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेला निरोप देताना सर्वजण भावुक झाल्याचे दिसून आले. अतिशय सुबक आणि अचूक नियोजन केल्यामुळे या स्नेहसंमेलनाची पंचक्रोशी चर्चा होत आहे.