Latest News

अकलूज शहरात कारमध्ये 480 लिटर हातभट्टी दारू पकडली ; जिल्हाभरात हातभट्ट्यांवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापासत्र

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात 

अकलूज : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र केली असून शनिवार-रविवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत वीस गुन्ह्यात विभागाने पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सविस्तर वृत्त असे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सात मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्हाभरात रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून ड्रायडे घोषित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील 72 तासांपासून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असून रविवारी दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज शहराच्या हद्दीत अकलूज-इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत, वय 38 वर्षे , राहणार बक्षीहिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या हुंडाई सेंट्रो कार क्रमांक MH 12 AN 5627 मधून चार रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले.

त्याच्या ताब्यातून दोन लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे,सहायक दुय्यम निरीक्षक आलेत शेख,जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांचे पथकाने केली.  जिल्हाभरात राबविलेल्या हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणांवरील मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील विविध हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून 180 लिटर हातभट्टी दारू व 12450 लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण चार लाख शहांशी हजार नऊशे पन्नास किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने की केगाव शिवाजीनगर परिसरातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रुकेश लक्ष्मण चव्हाण वय 21 वर्षे या इसमास 3500 लिटर रसायनासह पकडले.

 दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांनी देशमुख वस्ती केगाव येथे हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून सातशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले. दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांनी वैराग ता.बार्शी येथून अजित बाबासाहेब करांडे या इसमास साडेचार लिटर विदेशी दारू विक्री करताना पकडले तसेच त्यांच्या पथकाने सौरभ बाळू गेले या इसमास पावणेदहा लिटर बियर व साडेपाच लिटर विदेशी दारू विक्री करताना उपळाई ता. बार्शी या ठिकाणी गुन्हा नोंदवला. दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल त्रिशूल मधून अल्ताफ रमजान शेख याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्लू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या नऊ बाटल्या व किंगफिशर बियर 650 मिली क्षमतेच्या दहा बाटल्या  व अक्कलकोट ते हन्नूर रोडवरील प्रशांत चायनीज मधून विनायक अशोक जाधव याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्लू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या बारा सीलबंद बाटल्या जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला.

शनिवारी निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने महूद ता. सांगोला येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 900 लिटर रसायन जागीच नाश केले तसेच लखन रामचंद्र पवार वय तीस वर्षे याला त्याच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक. MH45 AA 6356 वरून प्लास्टिक कॅन मधून 35 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांच्या पथकाने शिंगोर्णी ता. माळशिरस येथे अजित उत्तम बोडरे वय 28 वर्षे याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 180 मिली क्षमतेचे 27 बाटल्या जप्त केल्या. दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने हतीद ता.सांगोला या ठिकाणी रखमाजी बाळा शिंदे याच्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 950 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले. दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांनी भाळवणी ता. करमाळा येथून दत्तू सोपान काळे याला 30 लिटर हातभट्टी दारू व 800 लिटर रसायनासह अटक केली. दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांनी पोहोरगाव ता.पंढरपूर येथून लतिका हंबीर काळे या महिलेच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारू संत्र्याच्या 55 सीलबंद बाटल्या जप्त केल्या.  निरीक्षक सीमा तपासणी नाका नांदणी यांच्या पथकाने तोगराळी ता. दक्षिण सोलापूर येथे लक्ष्मीनारायण बालय्या मच्छा यांच्या ताब्यातून सत्तर लिटर ताडी व जिजाबाई देवेंद्र तेलंग या महिलेच्या ताब्यातून 24 लिटर ताडी जप्त करून गुन्हा नोंदवला.

आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 402 गुन्ह्यात 323 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईत विभागाने 12654 लिटर हातभट्टी दारू, एक लाख 73 हजार 320 लिटर गुळमिश्रित रसायन, 705 लिटर देशी दारू, 345 लिटर विदेशी दारू, 206 लिटर बियर, सतराशे सत्तावीस लिटर ताडी, 243 लिटर गोवा राज्यातील दारू व 47 वाहने जप्त केली आहेत. 

जप्त केलेल्या दारू व इतर साहित्याची किंमत 89 लाख 18 हजार असून वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत एक कोटी 36 लाख 85 हजार इतकी आहे. 

जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये निवडणूक मतदान संपण्याच्या 48 तासापूर्वी म्हणजेच 5 मे सायंकाळी सहा वाजेपासून ड्रायडे घोषित करण्यात आला असून सर्व मद्य विक्री दुकाने सात मे रोजी मतदान संपेपर्यंत बंद राहतील. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत जिल्हाभरात एकूण बारा पथके नेमण्यात आली असून या पथकांकडून रात्रंदिवस धाबे, होटल, संशयित मद्य विक्री ठिकाणे, हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे इत्यादी ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहे. तसेच वागदरी ता. अक्कलकोट, नांदणी ता. दक्षिण सोलापूर व मरवडे ता. मंगळवेढा या ठिकाणी कर्नाटक राज्य सीमेवरील सीमा तपासणी नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.अधीक्षक व  उप अधीक्षक यांच्याकडून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्यात येत असून कुठेही दारूची वाहतूक किंवा वाटप होणार नाही यावर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे.

आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!