लाट… धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या समर्थनाची… रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधाची
महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : भारतीय जनता पक्षासाठी एकतर्फी वाटणारा माढा मतदार संघ मागील 10 ते पंधरा दिवसांपासून चिंतेचा विषय बनला आहे. त्याला कारण आहे पक्षाकडून जाहिर झालेली उमेदवारी. भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळक यांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि मतदार संघातून त्यांच्या विरोधाची प्रचंड मोठी लाट सुरू झाली आणि त्याच वेळी दुसरी त्याही पेक्षा मोठी लाट उफाळून आली आणि ती म्हणजे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या समर्थनाची.
पश्चिम महाराष्ट्र एव्हाना त्यामध्येच येणारा माढा लोकसभा मतदार संघ तसा पुरोगामी विचारसरणीचा मानला जातो. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यानंतर शरद पवार यांना मानणारा त्यांच्या विचारांवर चालणारा म्हणूनही पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे. सहकार महर्षि कै.शंकरराव मोहिते-पाटील व त्यांच्या पश्चात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही याच विचारांची कास धरून याच पश्चिम महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले.
सोलापूर जिल्ह्यासह, कराड, सातारा, सांगली, बारामती, इंदापूर या भागात निष्टा जपणारे व कोणत्याही पक्षाला बांधील नसणार्या कार्यकर्त्यांची मोठी फौज मोहिते-पाटील परिवाराने तयार केली व ती आजपर्यंत सांभाळली आहे. राजकारणातील चढ उतारात मागील काही वर्षात मोहिते-पाटलांनी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह एक दिलाने अगदी जिव ओतून, दिवस-रात्र एक करून पक्षासाठी काम केले. दरम्यान लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, मार्केट कमिटी, ग्रामपंचायत आदी निवडणुकांत पक्षाला घवघवीत यशही मिळवून दिले.
परंतु या यशातील खारीचा वाटा म्हणून हक्काने मागितलेली माढा लोकसभेची उमेदवारी पक्षाने नाकारली आणि मोहिते-पाटील काही बोलायच्या अगोदरच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसू लागली. एक लाखाच्या वर लिड देऊन ज्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून दिले ते मागील चार वर्षे मतदार संघापासून गायब तर राहिलेच परंतु मोहिते-पाटील व त्यांच्या समर्थकांच्या विरोधात त्यांनी जे कुरघोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला यामुळे त्यांच्या विषयीचा प्रचंड रोष आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. त्यांच्या विरोधातील प्रचंड मोठी लाट तयार झाली आहे.
तर दुसरीकडे मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांचे निष्टावान कार्यकर्ते एक होऊन आपल्या गटाच्या अस्तित्वासाठी, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी, गेली 10 ते 15 वर्षापासून मागे राहिलेल्या सोलापूर जिल्ह्याला पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी मोहिते-पाटलांशिवाय पर्याय नाही असे म्हणत लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कसल्याही परिस्थितीत उभे राहिलेच पाहिजे असा आग्रह धरू लागले आहेत. कार्यकर्त्यांचे प्रेम व जनभावनेची एवढी प्रचंड लाट आजवर कोणत्याही निवडणूकीत पहायला मिळाली नसल्याचे राजकीय जाणकार आवर्जून सांगत आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी मैदानात उतरल्यास हि निवडणूक एकतर्फी होईल याबाबत कोणाच्या मनात शंका नसल्याचे बोलले जात आहे.