बोगस प्रकरणांमध्ये कार्यालयीन कर्मचार्याचे लागेबांधे ; नावे बदलून दोन वेळा मोबदला घेण्याचा प्रस्ताव? संत तुकाराम पालखी महामार्गाच्या भूसंपादनातील प्रकार
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातून जाणार्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये कंत्राटी कार्यालयीन कर्मचार्यांनी आपल्या तुंबड्या भरून घेण्यासाठी नंगानाच केला असून अधिकचा मोबदला, दुबार मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली कोट्यावधींची माया जमा केली आहे. याकडे वरीष्ठ अधिकार्यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष आहे की त्यांचाही यामध्ये सहभाग आहे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
माळीनगर, सवतगव्हाण, तांबवे या गावाच्या हद्दतील जवळपास 8 ते 9 प्रकरणे सध्या फेर मुल्यांकनासाठी दाखल करण्यात आल्याची खात्रीशिर माहिती महर्षि डिजीटल न्यूज ला मिळाली आहे. हे फेर मुल्यांकन का करण्यात येत आहे. अगोदर मुल्यांकन होऊन संबंधितांना त्याचा मोबदला मिळाला असताना त्याच जागेचे, त्याच घराचे नावे बदलून, असिसमेंट उतारा बदलून, बोगस असिसमेंट उतारा जोडत फेर मुल्यांकन करून अधिकचे पैसे उकळण्याचा घाट सवतगव्हाण गावचे एजंट व कार्यालयीन कंत्राटी कर्मचार्यांनी घातल्याचे बोलले जात आहे.
शासनाची फसवणूक करून जनतेचा पैसा अशा प्रकारे लुबाडणार्या कंत्राटी कर्मचारी, एजंट, बोगस प्रकरणे दाखल करणारे तसेच बोगस असिसमेंट उतारे देणार्या ग्रामपंचायतींची सखोल चौकशी करण्याची गरज असून चौकशी अंती अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (क्रमश:)
पुढील भागात… 10 ते 20 हजारात बोगस असिसमेंट उतारा?