खासदार निंबाळकर यांना उमेदवारीतही “गाजर”च मिळणार ? २ लाखांचे लीड देण्याचे आश्वासन देणाऱ्या माढ्यातील आमदाराच्या तालुक्यातच मतदारांनी दाखवले गाजर

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विषयीचा राग शेतकरी व नागरिकांना अनावर होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी नागरिक त्यांचा प्रचंड विरोध करत असताना कालच्या “गाजर” प्रकरणावरून सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडविली जाऊ लागली आहे.
विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहिर होण्या अगोदरच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना २ लाखाच्या मताचे लीड देण्याची भाषा करणाऱ्या आमदार बबनराव शिंदे यांच्या माढा तालुक्यातच विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या ताफ्यावर गाजर फेक आंदोलन करण्यात आले. ते जात असलेल्या मार्गावर काही ठिकाणी गाजर फेकून त्यांचा निषेध करण्यात आला.
तर दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या चांदज ते टनू पुलाचे श्रेय लाटण्यासाठी त्याचे भूमिपूजन करण्याच्या प्रयत्नात असलेले खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे यांना डावलून तेथील ग्रामस्थांनीच त्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केल्याने त्यांच्या विषयीचा रोष उघड झाला आहे.
शिवाय आमदार पुत्र असलेले रणजीत सिंह शिंदे यांनाही मराठा आंदोलकांनी गावातून हाकलून दिल्याने दोन लाखाचे लीड देण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांच्याच तालुक्यात तीव्र विरोध होत असल्याचे दिसून येत असल्याने पुढील विधानसभेत त्यांची आमदारकीही धोक्यात असल्याचे आता उघडपणे लोक बोलू लागले आहेत. त्यामुळे खासदारांबरोबरच आमदारांनाही माढा तालुक्यातील नागरिक गाजर दाखवतील हे मात्र निश्चित मानले जात आहे.



