पोळा सणानिमित्त पांडुरंग कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिलासा ; प्रति मे.टन ७५ रुपये दराने ऊस बिल बँकेत वर्ग केल्याची प्रशांतराव परिचारक यांची माहिती

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परंपरेनुसार यंदाही पोळा सणानिमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मे.टन ७५ रुपये दराने ऊस बिल बँकेत वर्ग करण्यात आले आहे. ही परंपरा स्व. सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांनी सुरु केली होती, ती आजही जपली जात असल्याचे गौरवोद्गार कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी यावेळी काढले.
कारखान्याच्या उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, तसेच संचालक मंडळ आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रशांतराव परिचारक म्हणाले, “कारखान्याच्या स्थापनेपासून शेतकऱ्यांना पोळा सणासाठी आर्थिक मदत व्हावी या हेतूने ऊस बिल अदा करण्याची परंपरा सुरू आहे. ही परंपरा आम्ही कायम जपली असून, यंदाही गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या ऊसास प्रति मे.टन ७५ रुपये या दराने रक्कम बँकेत जमा केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.”
कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, “गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या ऊसास आजअखेर प्रति मे.टन २,७०० रुपये अदा करण्यात आले असून, पोळा सणासाठी ७५ रुपये प्रती मे.टनची भर घालून एकूण २,७७५ रुपये प्रति मे.टन इतकी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. ही रक्कम केंद्र सरकारच्या एफ.आर.पी. (FRP) दरापेक्षा अधिक आहे.”
गळीत हंगाम २०२५-२६ साठी सुमारे १५,००० हेक्टर क्षेत्रावर ऊस नोंदवला गेला असून, अंदाजे १२ ते १४ लाख मे.टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. या संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप करण्याची तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, सिताराम शिंदे, शामराव साळुंखे, राणू पाटील आदी उपस्थित होते.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना मागील पंधरा वर्षांपासून जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट ऊस दर देणारा कारखाना म्हणून शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. पोळा सणासारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांची गरज ओळखून रक्कम वेळेवर देण्याची परंपरा जपणाऱ्या या कारखान्याचे क्षेत्रात विशेष कौतुक होत आहे.



