त्या “काही” खासदारा मध्ये माढ्याचे “ना.नि” सुध्दा ? ; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट मुळे शिक्कामोर्तब*

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : आज सकाळपासूनच वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या बातमीने विद्यमान भाजपा खासदारांमध्ये धाकधूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये माढ्याचे खासदार सुद्धा अपवाद नाहीत. अशातच सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टमुळे तर त्यांचा पत्ता नक्कीच कट होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे वातावरण तापू लागले आहे गेली चार साडेचार वर्ष अपवादाने दिसणारे खासदार आता राजकीय पुढार्यांचे उंबरठे झिजवताना दिसू लागले आहे. शिवाय मतदारांमध्ये असलेली प्रचंड नाराजी दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना विद्यमान खासदार इतर पक्षातील आमदाराच्या तोंडून आपले भरभरून कौतुक करवून घेताना दिसत आहेत. यातूनच मग दोन लाखाच्या लीड सारखे हास्यास्पद आणि तेवढिच अशक्यप्राय असणारी विधाने ऐकायलाही मिळत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या महाराष्ट्रातील विद्यमान खासदारांच्या कामगिरीचा आढावा नुकताच घेण्यात आला असून यामध्ये काही खासदारांच्या बाबतीत नाराजीचा सूर असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने आज प्रसारित केले आहे. या काही खासदारांमध्ये माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचाही समावेश असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. योगायोगाने त्याला कारण असलेली पोस्ट ही सोशल मीडियात धुमाकूळ घालत असल्याने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित मानले जाऊ लागले आहे.
काय आहे सोशल मीडियावरील पोस्ट?
या पोस्टमध्ये खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विधानसभा मतदार संघ निहाय विद्यमान आमदारांच्या समर्थकांची नाराजी असलेली टक्केवारी दर्शविण्यात आली आहे. यात माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या 25 ते 30 टक्के समर्थकांची नाराजी, सांगोला मतदार संघाचे आमदार शहाजी पाटील यांच्या 26 ते 32 टक्के समर्थकांची नाराजी, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या 30 ते 35 टक्के समर्थकांची नाराजी, माणच्या आमदार जयकुमार गोरे यांच्या 35 ते 40 टक्के समर्थकांची नाराजी, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्या 66 ते 70 टक्के समर्थकांची नाराजी तर माळशिरसचे आमदार राम सातपुते व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या 70 ते 75 टक्के समर्थकांची नाराजी असलेली पोस्ट वायरल होताना दिसत आहे.
या पोस्टमध्ये तथ्य असेल तर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार अशी ही चर्चा सुरू झाली आहे.
