राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करणार – शिवतेजसिंह मोहिते-पाटील
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूजने नेहमीच विविध खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. भविष्यात आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथे राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुलात उद्योग महर्षी कै.उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्ताने मित्र मंडळ,महर्षी जिमखाना व स्पोर्ट्स असोसिएशन,माळशिरस तालुका बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ते 15 ऑक्टोबर 2023 या तीन दिवसाच्या कालावधीत उद्योग महर्षी चषक राज्यस्तरीय बास्केट बोल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेचे उदघाटन आर्यवीरसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते मैदान पुजन करुन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,नंदिनीदेवी मोहिते पाटील,मदनसिंह मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील, ईश्वरीदेवी मोहिते पाटील, देवन्या मोहिते पाटील, अॅड.नितीन खराडे, अनिल जाधव आदीसह मित्र मंडळाचे सदस्य,खेळाडु, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेत सॅव्हिओ क्लब मुंबई,ए.सी.ए व ए.एस.स्पोर्ट्स पुणे चॅम्पियन्स छत्रपती संभाजीनगर,जयहिंद कडा-बीड, फिनिक्स संगमनेर,नेक्सस स्पोर्ट्स नांदेड,सातारा जिमखाना सातारा,विद्या प्रतिष्ठान,ग्रीन स्टार,सेलिब्रेशन सोलापुर,शिवरत्न स्पोर्ट्स अकॅडमी शंकरनगर हे 12 संघ सहभागी झाले असुन स्पर्धेतील विजेता संघास रोख रु 51 हजार व उद्योग महर्षी चषक, उपविजेता 31 हजार,तृतीय 21 हजार, चतुर्थ 11 हजार ,स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडु 3 हजार व ट्रॉफी असे बक्षीस देण्यात येणार आहे.
आज पहिल्या दिवशी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अकलूज येथे उद्योग महर्षी चषक राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धेत सॅव्हिओ स्पोर्ट्स क्लब मुंबई,शिवरत्न स्पोर्ट्स अकॅडमी शंकरनगर,नेक्सास नांदेड,ए.सी.ए.पुणे संघांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवित स्पर्धेत आगेकुच केली. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना विद्या प्रतिष्ठान सोलापुर विरुध्द शिवरत्न स्पोर्ट्स अकॅडमी शंकरनगर यांच्यात झाला. शिवरत्न अकॅडमीने हा सामना 51 विरुध्द 41 असा 10 गुणांनी जिंकला. तर दुसरा सामना सॅव्हिओ क्लब मुंबई विरुध्द सातारा जिमखाना यांच्यात अखेर क्षणापर्यंत अटीतटीचा आणी रोमहर्षक झाला अखेरच्या क्षणाला मुंबई संघाने सातारा संघावर 1 गुणाची आघाडी घेत सॅव्हिओ क्लब मुंबईने हा सामना 65 विरुध्द 64 असा जिंकला.त्यानंतर जयहिंद कडा-बीड विरुध्द नेक्सास नांदेड संघादरम्यान सामन्यात नेक्सास नांदेडने जयहिंद चा 74 विरुध्द 59 असा 15 तर ए.सी.ए.पुणे विरुध्द चॅम्पियन्स छत्रपती संभाजीनगर सामन्यात ए.सी.ए.पुणे संघाने चॅम्पियन्सवर 55 विरुध्द 44 असा 11 गुणाने विजय मिळवून स्पर्धेत आगेकुच केली.
या स्पर्धेसाठी नितीन चपळगावकर, विनोद गोस्वामी,सलिम शेख, राजेंद्र नारायणकर,माजिद खान,सादात खराटा,शकिन ईटकर, दिपक पाटील, झकी लोकापल्ली, आजिम नदाफ, उमेश शिकारे,शशांक गायकवाड, लखन मोरे,रोहित पवार हे पंचाचे काम पहात आहेत.