महाराष्ट्रविशेष

पालखी महामार्गाच्या भूसंपादनाचे निवाडे अंतिम टप्प्यात ; एजंटांची लगबग वाढली, बोगस प्रकरणांबरोबरच प्रचंड टक्केवारीचेही चर्चा

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातून जाणार्‍या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे भूसंपादनाचे निवाडे अंतिम टप्प्यात असतानाच गेल्या काही दिवसांपासून भूसंपादन अधिकारी तथा प्रांत अधिकारी कार्यालयात खाजगी एजंटाची रेलचेल वाढल्याचे चित्र दिसत आहे अगोदरच बोगस प्रकरणे व प्रचंड टक्केवारीची चर्चा सुरू असतानाच एजंटांची लगबग संशयास्पद चित्र निर्माण करत आहे

माळशिरस तालुक्यातुन जाणार्‍या संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी महामार्गाचे काम जवळपास 80 टक्के तर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असतानासुध्दा अद्यापही अनेकांची भूसंपादनाची प्रकरणे प्रलंबित आहेत.

तत्कालीन भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी शमा पवार यांच्या बदलीनंतर बराच काळ नियमीत अधिकारी न मिळाल्याने प्रलंबित प्रकरणांचा निकाल लागू शकला नाही. परंतु गेल्या काही महिन्यापूर्वी नियमीत कारभाराचा पदभार स्विकारलेल्या प्रांतअधिकारी नामदेव टिळेकर यांच्यापुढे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

दोन्ही पालखी महामार्गाची जवळपास 400 ते 450 प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे त्यांच्याकडून प्रामाणिक प्रयत्न होत असतानाच कार्यालयातील काही कंत्राटी कर्मचारी व काही एजंट यांचे लागेबांदे असल्याची जुनी चर्चा पुन्हा एकदा तोंड वर काढू लागली आहे. भूसंपादित झालेल्या जमिन, झाडे, फळबागा, घरे, पाईपलाईन इत्यादींचा वाढीव मोबदला मिळवून देण्याच्या आश्‍वासनातून कार्यालयीन कर्मचारी व एजंट ठरावीक टक्केवारी घेऊन बाधीत नागरीकांना वेठीस धरत असल्याची चर्चा आहे.

त्यामुळेच कार्यालयीन कामकाजाच्या दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयाच्या परिसरात तर या एजंटांची लगबग दिसून येतेच शिवाय भूसंपादनाचे कामकाज सांभाळणार्‍या कर्मचार्‍यांबरोबर कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही हे एजंट कधी कार्यालयाच्या कोपर्‍यात तर कधी बाहेर चहाच्या टपरी वर हॉटेलवर गुप्त बैठका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाचा वाढिव पैसा भूसंपादनात बाधित झालेल्या संबंधितांना मिळवून देण्याबरोबरच एजंट व काही कंत्राटी कर्मचारी ‘मिलबाटके’ लुबाडत असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

(विहीर व पाईपलाईनची बोगस प्रकरणे व झाडांच्या प्रकरणात कोणाचे डबल प्रस्ताव लवकरच महर्षि डिजीटल न्यूज वर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!