Latest News

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर बोट ; RTE घोटाळ्याला कोण जबाबदार? 

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : अकलूजसह माळशिरस तालुक्यात शिक्षणाचा हक्क (RTE) प्रवेश प्रक्रियेत उघड झालेल्या गैरकारभाराच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेषतः गटशिक्षणाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे व निष्काळजीपणामुळेच हे प्रकार वाढत असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

स्थानिक पातळीवर येणाऱ्या तक्रारी, संशयास्पद अर्ज आणि बनावट कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी असताना, संबंधित यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय राहिल्याचा आरोप केला जात आहे. “डोळेझाक करूनच प्रवेश दिले गेले का?” असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

माहितीनुसार, बनावट भाडेकरार, खोटे पत्ते आणि शाळेजवळ वास्तव्यास असल्याचे खोटे दाखवणाऱ्या अर्जांची योग्य तपासणी न झाल्यानेच अनेक अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. यामागे केवळ पालकांचीच चूक नसून, पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणालाही तितकीच जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, महर्षी डिजिटल न्यूजने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या या प्रकरणावरील बातमीला मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक वाचकांनी सदर बातमीचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावरही या विषयावर चर्चा रंगली असून, नागरिकांनी थेट प्रशासनालाच जबाबदार धरत “अशा प्रकारचे गैरप्रकार केवळ अकलूज-माळशिरसपुरते मर्यादित नसून इतर ठिकाणीही सुरू आहेत,” असा दावा केला आहे.

काही पालकांनी तर थेट आरोप केला आहे की, “तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. अधिकारी दुर्लक्ष करतात, त्यामुळेच असे प्रकार बिनधास्तपणे सुरू आहेत.” यामुळे शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे संशय अधिकच गडद होत असून, “नेमके कोणाला वाचवले जात आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच RTE प्रवेश प्रक्रियेला पारदर्शकता आणावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, येत्या काळात पालक व नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!