अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक अत्याचार; अकलूजच्या दोघांना न्यायालयाकडून शिक्षा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अल्पवयीन मुलीला तिच्या नातेवाईकाकडून घरी सोडण्याच्या बहाण्याने ताब्यात घेत, दुसऱ्या आरोपीच्या मदतीने पळवून नेऊन विविध ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले आहे. आरोपी क्रमांक १ तसलिम ताजुद्दीन शेख याला तीन वर्षांचा कारावास व दंड, तर आरोपी क्रमांक २ अमर रहिम शेख याला अपहरणाच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांचा कारावास तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियमाच्या कलम ४ अंतर्गत २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२३ रोजी आरोपी अमर रहिम शेख याने पीडितेला तिच्या नातेवाईकाकडून ‘घरी नेऊन सोडतो’ असे सांगून अकलूज येथून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी तसलिम ताजुद्दीन शेख याच्या मदतीने पीडितेला पळवून नेण्यात आले. आरोपी क्रमांक १ याने मोटारसायकलवरून अकलूजहून आरोपी क्रमांक २ व पीडितेला माळशिरस बसस्थानकावर सोडले.
त्यानंतर २० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत आरोपीने पीडितेला सातारा, गणपतीपुळे, विशाळगड आदी ठिकाणी नेले. या कालावधीत विविध हॉटेल, लॉज व रूममध्ये राहून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश बी. चौधरी यांनी सखोलपणे करून दोन्ही आरोपींविरुद्ध माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. हुली यांच्या न्यायालयात झाली.
खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपी क्रमांक २ च्या बाजूने दोन साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, तिची आई, पीडितेचा नातेवाईक, दोन वैद्यकीय अधिकारी, हॉटेल व लॉजचे मालक तसेच तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत आरोपी क्रमांक १ तसलिम ताजुद्दीन शेख याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ सह ३४ अंतर्गत तीन वर्षांचा कारावास व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
आरोपी क्रमांक २ अमर रहिम शेख यालाही कलम ३६३ सह ३४ अंतर्गत तीन वर्षांचा कारावास व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास, तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियमाच्या कलम ४ अंतर्गत २० वर्षांचा कारावास व ७ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात अकलूज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले. सरकार पक्षातर्फे अॅड. संग्राम एस. पाटील यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एम. तांबोळी व पोलीस कॉन्स्टेबल के. एस. हांगे यांनी केली.



