Latest News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची पंतप्रधानांकडे मागणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

खासदार मोहिते-पाटील यांनी दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधानांना पत्र पाठवून अण्णाभाऊ साठे यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करण्याची मागणी केली आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १९२० मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे दलित समाजातील अत्यंत गरीब कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या विलक्षण प्रतिभा, अदम्य संघर्ष आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर मराठी साहित्य व लोककलेच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.

अण्णाभाऊ साठे यांनी १३ लोकनाट्ये, ३५ कादंबऱ्या, १३ कथासंग्रह, १५ पोवाडे, १२ चित्रपट कथा आणि ७ पटकथा यांसह विपुल साहित्याची निर्मिती केली. त्यांचे साहित्य केवळ मराठी भाषेपुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरले.

त्यांची प्रसिद्ध ‘फकिरा’ ही कादंबरी मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा मानली जाते. या साहित्यकृतीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला असून, तिचे २७ मराठी तसेच विविध परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी शोषित, पीडित, श्रमिक, वंचित आणि उपेक्षित वर्गाच्या जीवन-संघर्षाला प्रभावीपणे वाचा फोडली. त्यांच्या लेखनातून सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार करण्यात आला.

“अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि जीवनदर्शन आजही कोट्यवधी भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय साहित्य, लोकसंस्कृती आणि सामाजिक चेतनेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे,” असे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा सन्मान हा केवळ एका साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा गौरव नसून सामाजिक न्याय, समावेशिता आणि भारतीय लोकशाही मूल्यांप्रती राष्ट्राची बांधिलकी अधोरेखित करणारा निर्णय ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे जनभावना आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अद्वितीय राष्ट्रीय योगदानाचा विचार करून त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!