अकलूज उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी मंजुरीच्या मागणीसाठी २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरचे चार दिवसापासून आमरण उपोषण सुरू ; प्रकृती ढासळत चालली

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूज उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी मंजूर झालेल्या १०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करावा, या मागणीसाठी माणकी (ता. माळशिरस) येथील २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर जयवंत पांडुरंग केंगार यांनी १ ऑगस्टपासून अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे केंगार यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली असून, प्रशासनाने या आंदोलनाची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.
अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे ५० खाटांवरून १०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, मंजुरीनंतरही प्रत्यक्ष बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध झालेला नसल्याने बांधकाम रखडल्याचा मुद्दा केंगार यांनी उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर केंगार यांनी आरोग्य विभागाकडे निवेदन देत आगामी पावसाळी अधिवेशनात रुग्णालयाच्या बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करून बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, निधी मंजुरीबाबत ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी १ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच आपण उपोषण सोडणार, अशी भूमिका जयवंत केंगार यांनी घेतली आहे.
दरम्यान, आमरण उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने केंगार यांची प्रकृती ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन शासन व आरोग्य विभागाने तातडीने या मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
२२ वर्षीय सुशिक्षित सिव्हिल इंजिनिअर युवकाने अकलूजच्या आरोग्य सुविधांसाठी सुरू केलेल्या या आमरण उपोषणाची आरोग्यमंत्री आणि शासन कितपत गांभीर्याने दखल घेतात, तसेच १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी कधी मंजूर होतो, याकडे आता माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे.



