Latest News

अतिवृष्टीचा इशारा : उजनी धरणातून 70 हजार क्युसेक विसर्ग; जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

सोलापूर : भारतीय हवामान विभागाने पुणे, सातारा आणि घाट परिसरात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यास 1 ऑगस्ट 2026 पर्यंत पूरस्थितीचा इशारा दिला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणातून सुमारे 70 हजार क्युसेक, तर वीर धरणातून 33 हजार 468 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, पावसाच्या तीव्रतेनुसार या विसर्गात वाढ अथवा घट होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

नद्यांमधील वाढता पाणीप्रवाह लक्षात घेता भीमा, नीरा नदीकाठ तसेच नाल्यालगतच्या गावांना पूराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठावरील नागरिक, जनावरे तसेच सार्वजनिक व खासगी मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावेत, संबंधित विभागप्रमुखांनी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी, नाले आणि धरण परिसरातील गावांमध्ये दवंडीच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.

नागरिकांनी पूरस्थितीत कोणत्याही परिस्थितीत पाण्याखाली गेलेले पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. मुसळधार पावसात झाडाखाली थांबू नये, पूरग्रस्त भागात विनाकारण फिरू नये, तसेच बचावकार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पूरकाळात साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांपासून सावध राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पिण्याचे पाणी उकळूनच वापरावे, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत मध्यम महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून, नागरिकांनी हवामानाच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!