अकलूजच्या नवीन बाजार तळावर सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात ; व्यापारी व नागरिकांना मिळणार अधिक चांगल्या सुविधा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूज शहरातील नवीन बाजार तळ – आठवडा बाजार येथे व्यापारी बांधव तसेच नागरिकांच्या सोयीसाठी सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून हे काम हाती घेण्यात आले आहे.
आठवडा बाजारात दर आठवड्याला मोठ्या संख्येने व्यापारी तसेच नागरिकांची वर्दळ असते. पावसाळ्यात बाजार तळावर चिखल, पाणी साचणे आणि असुविधा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यापारी व नागरिकांना बाजारपेठेत ये-जा करताना होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरण मिळावे, या उद्देशाने बाजार तळाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.
या कामामुळे पावसाळ्यात बाजार तळावर चिखल व पाणी साचण्याची समस्या कमी होऊन व्यापारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच बाजारपेठ अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. रेश्माताई अडगळे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून अकलूज शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले जात आहे. शहरातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध विकासकामे हाती घेण्यात येत असून, नवीन बाजार तळाचे काँक्रिटीकरण हे त्याचाच एक भाग आहे.
या कामामुळे आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापारी बांधवांसह नागरिकांना पावसाळ्यातही अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, बाजारपेठेच्या व्यवस्थेतही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



