अस्ती विसर्जन न करता स्मशानभूमीत रक्षाविसर्जन व वृक्षारोपण; विजय माने शेंडगे यांना अनोखी श्रद्धांजली

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : वाघोली येथील युवा नेते आणि पैलवान विजय विष्णू माने शेंडगे (वय 38) यांचे 19 फेब्रुवारी 2025 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीमध्ये कुठलेही कर्मकांड न करता आणि पारंपरिक अस्थी विसर्जन न करता, स्मशानभूमी व त्यांच्या राहत्या घरी वृक्षारोपण करून सर्व रक्षा झाडाच्या मुळाशी टाकण्यात आल्या.
सकाळी राष्ट्रमाता जिजाऊ आणि विजय माने यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विधीची सुरुवात झाली. यावेळी जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. विधी संपल्यानंतर सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींनी रक्षाविसर्जन करून वृक्षारोपण केले. परंपरागत दहाव्याच्या विधीऐवजी सातव्या दिवशी सर्व विधी करून सुतक संपवण्याचा निर्णय माने शेंडगे कुटुंबीयांनी घेतला.
या अनोख्या विधीला माने शेंडगे कुटुंबीयांसह गावातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय माने यांना ग्रामस्थांच्या आणि नातेवाईकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सुरेश पवार आणि दिगंबर मिसाळ यांनी वाहिली.
विजय माने हे सूतगिरणीचे संचालक मोहन विठ्ठल माने शेंडगे आणि उत्तमराव माने यांचे पुतणे तसेच गणेश माने आणि योगेश माने यांचे बंधू होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे वडील विष्णू माने यांचेही हृदयविकाराने निधन झाले होते. त्यामुळे माने शेंडगे कुटुंबावर अल्पावधीतच दोन मोठे आघात झाले आहेत. संपूर्ण वाघोली आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली असून या कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना उपस्थित नातेवाईकांनी व्यक्त केली.
विधी प्रसंगी पुष्कराज अमोल माने यांनी जिजाऊ वंदना सादर केली. तसेच प्रसंगिभूमी अभिलेख उपसंचालक अनिल माने, अमोल माने, योगेश माने, अजित माने, सूर्यकांत माने शेंडगे, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, सतीश माने शेंडगे, पैलवान भारत सांगडे, जिजाऊ ब्रिगेडच्या अक्का ताई माने, माजी सरपंच वृषाली माने, दिगंबर माने, सुनील माने, डॉक्टर गिरीश माने आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
परंपरागत विधींना फाटा देत विजय माने यांच्या कुटुंबीयांनी निसर्गपूरक श्रद्धांजलीचा आदर्श निर्माण केला आहे. समाजाला नवीन दिशा देणाऱ्या या अनोख्या विधीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सातव्या दिवशी अंतिम विधी पार पाडण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी जाहीर केले.