प्रताप क्रीडा मंडळाच्या रत्नाई मिठाई केंद्राचे उद्घाटन ; ना नफा,ना तोटा तत्वावरील सामाजिक उपक्रम

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने समाजातील गरजू लोकांना दिवाळीचा सण साजरा करता यावा यासाठी गुणवत्तापूर्वक व योग्य दरात रत्नाई मिठाई या उपक्रमातून दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी सांगितले.
कला, क्रीडा , सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने समाजातील गरजूंना दरवर्षी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर सवलतीच्या दरात रत्नाई मिठाई उपलब्ध करून देण्यात येते. या मिठाई स्टॉलचे उद्घाटन प्रदीपराव खराडे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पांडुरंग एकतपुरे, वसंत जाधव, उत्कर्ष शेटे, मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभिषन जाधव, मदन महाराज, सर्व संचालक, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गरजूंना दिवाळीचा सण साजरा करता यावा यासाठी अल्प दरात रत्नाई मिठाई हा उपक्रम सुरू करण्यात आला . तर सामाजिक बांधिलकी जोपासत मंडळाच्या वतीने गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी,विजय विद्यार्थी वसतीगृह अकलूज, कमला नेहरू मुलींचे वसतिगृह नातेपुते, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यार्थी वसतिगृह मोरोची या ठिकाणीही मिठाई वाटपाचे काम सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते सुरू आहे.
प्रदीपराव खराडे पाटील म्हणाले, प्रताप क्रीडा मंडळाच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे दिवाळी सुखकर होत आहे येथील पदार्थ गुणवत्तापूर्वक असल्याने याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रस्ताविकात विजय उबाळे म्हणाले, दि. १५ व १६ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १० ते ८ पर्यंत शंकरनगर येथे ‘रत्नाई मिठाई विक्री केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. या मध्ये लाडू, शेव, चिवडा, बालुशाही, शंकरपाळी व चकली हे पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सूत्रसंचालन आर आर पाटील यांनी केले.



