माढा लोकसभा मतदारसंघातील रस्ते-पुलांच्या दुरावस्थेकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वेढले लक्ष ; राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांची घेतली भेट

महर्षि डिजीटल न्यूज
मुंबई : माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस, माण, पंढरपूर आणि माढा तालुक्यातील रस्ते व पुलांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या गंभीर विषयावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुंबईत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सार्वजनिक उपक्रम) मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांची भेट घेतली.
या भेटीत खासदार मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अंतर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांच्या खराब स्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. मतदारसंघातील अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्ती अर्धवट राहिल्याने नागरिकांना वाहतुकीच्या अडचणी, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
“ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होत आहे,” असे मोहिते पाटील यांनी राज्यमंत्र्यांसमोर स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह सविस्तर आढावा बैठक घेण्याची विनंती केली.
राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी या बाबीची गंभीर दखल घेत, आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून माढा मतदारसंघातील नागरिकांच्या वाहतुकीच्या सुविधा सुधारण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



