सरकारचा भेकडपणा ; परवानगी नाकारली तरी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन होणारच

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
पंढरपूर : पंढरपुरात १२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” आंदोलनाला प्रशासनाने अवघ्या ३६ तासांपूर्वी परवानगी नाकारल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत प्रशासनाने परवानगी नाकारली असली, तरी हा निर्णय सरकारच्या दबावातून घेतल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “आंदोलनाला अडथळा आणण्याचा सरकारचा हा प्रयत्न असून हा निव्वळ भेकडपणा आहे,” असा थेट आरोप केला आहे.
पवार यांनी स्पष्ट केले की, नामदेव पायरीजवळ आंदोलन करण्याची संधी असतानाही वारकरी आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका कोपऱ्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण स्वरूपाचे असून आंदोलनस्थळी कोणतीही वाहनांची गर्दी होणार नसल्याने वाहतूक किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे कारण नसल्याचा दावा त्यांनी केला.
“प्रशासनाने आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शेतकऱ्यांमधील संताप सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे,” असा टोला लगावत पवार यांनी सरकार आणि प्रशासन दोघांनाही लक्ष्य केले.
दरम्यान, प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पवार यांनी ठामपणे जाहीर केले आहे. “परवानगी दिली तरी आंदोलन होणार आणि नाही दिली तरी आंदोलन होणारच,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.
कर्जमाफीसाठी लागू करण्यात आलेल्या जाचक अटी-शर्ती रद्द केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे सांगत पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे १२ जून रोजी पंढरपुरात होणारे “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” आंदोलन आता केवळ शेतकरी प्रश्नांपुरते मर्यादित न राहता सरकार विरुद्ध विरोधक असा मोठा राजकीय संघर्ष ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर माघार घेते की आंदोलनाच्या संघर्षाला सामोरे जाते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



