धारदार शस्त्रांनी हल्ला करून अजित बोरकर गंभीर जखमी; अकलूजमध्ये उपचार सुरू

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 19 जून) रात्री घडली. या घटनेमुळे माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली असून बोरकर यांच्यावर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित बोरकर हे शुक्रवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास निमगाव पाटी परिसरातील त्यांच्या कार्यालयाशेजारी मोबाईलवर बोलत उभे होते. त्यावेळी सफारी वाहनातून आलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्र तसेच लोखंडी रॉडचा वापर करून त्यांना गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात बोरकर गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बोरकर यांना तत्काळ अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच शनिवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार Raju Shetti हे रविवारी अकलूज येथील रुग्णालयात भेट देऊन अजित बोरकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेचे तीव्र राजकीय व सामाजिक पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत असून प्रशासनानेही सतर्क भूमिका घेतली आहे. अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) वाळके तसेच पोलीस निरीक्षक उबाळे यांनी शनिवारी पहाटे रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. शनिवारी दिवसभर बोरकर यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिकांची मोठी गर्दी रुग्णालयात पाहायला मिळाली.



