अन्नदात्याचा एल्गार ; आ.रोहित पवार पुन्हा रणांगणात, कर्जमाफीसाठी आता मराठवाड्यात आंदोलन

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
पंढरपूर : विनाअट सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा संघर्ष अधिक तीव्र करत आमदार यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. “आता खूप झाली चर्चा, वेळ आहे निर्णय घेण्याची; तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” असा इशारा देत त्यांनी मराठवाड्यातील दौऱ्याची घोषणा केली आहे.
रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, पंढरपूरच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांना दिलेला विनाअट सरसकट कर्जमाफीचा शब्द सरकारने पाळला नाही. हा अन्नदात्याचा विश्वासघात असून या धोकेबाज सरकारला वठणीवर आणण्यासाठी पुन्हा जनतेच्या न्यायालयात जाण्याची वेळ आली आहे.
त्यांच्या मते, सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. यासाठी २४ जूनपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत बैठका, संवाद आणि जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आंदोलनाच्या नव्या टप्प्याची सुरुवात करण्यात येणार आहे. पंढरपूर येथून सुरू होणारा हा दौरा धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत जाणार आहे.
दौऱ्याचा समारोप २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या ‘अन्नदात्याचा एल्गार’ या मेळाव्याने होणार आहे. या एल्गारातून सरकारवर अधिक दबाव निर्माण करून विनाअट कर्जमाफीचा निर्णय घेण्यास भाग पाडण्याचा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
रोहित पवार यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “संतप्त अन्नदात्याच्या आसूडाचे वळ सरकारच्या पाठीवर उठल्याशिवाय राहणार नाहीत. चर्चा पुरेशी झाली, आता निर्णय हवा.”
त्यामुळे आगामी काही दिवसांत राज्यातील कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक पातळीवर केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकरी संघटना, कार्यकर्ते आणि सामान्य शेतकरी या आंदोलनाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.



