Latest News

काय तो आत्मविश्वास… काय ती बॉडी लँग्वेज…! निकाल काहीही लागू दे, पण खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मनं जिंकली

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : सोलापूर विधान परिषद निवडणूक यंदा जितकी चर्चेत राहिली, तितकी कदाचित यापूर्वी कधीच झाली नव्हती. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच राजकीय घडामोडींनी वेग घेतला आणि शेवटच्या मतदानापर्यंत उत्सुकता कायम राहिली. मात्र या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नेतृत्व, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या देहबोलीतून दिसून आलेला विजयाचा विश्वास.

काँग्रेससाठी सुटलेल्या या जागेवर त्यांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून वसंतनाना देशमुख यांना मैदानात उतरवले. परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद उघडपणे समोर आला. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही आमदारांनी उघडपणे महायुतीच्या आणि भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने समीकरणे बदलल्याचे चित्र निर्माण झाले.

अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांच्या मते महाविकास आघाडीची लढत कमकुवत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र खा. धैर्यशील मोहिते-पाटील आणि उमेदवार वसंतनाना देशमुख यांनी परिस्थितीचा कोणताही बाऊ केला नाही. उलट, त्यांनी नेहमीपेक्षा अधिक ताकदीने आणि अधिक जोमाने निवडणुकीची सूत्रे हातात घेतली.

विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ स्पष्टपणे आपल्या बाजूने नसतानाही मोहिते-पाटील यांनी संपूर्ण जिल्हा अक्षरशः पिंजून काढला. गावोगावी, मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचत त्यांनी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी मतदारांना पटवून देण्याचा त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केला. त्यांच्या दौऱ्यांचा वेग, बैठका, संपर्क मोहीम यामुळे निर्माण केलेला उत्साह यामुळे निवडणुकीत नवे चैतन्य निर्माण झाले.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे करण्यात आले. मात्र मतदानानंतरही सर्वाधिक चर्चा झाली ती खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या आत्मविश्वासाची. निकालाबाबत कोणतीही अस्वस्थता किंवा दबाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला नाही. उलट त्यांची बॉडी लँग्वेज आणि कार्यकर्त्यांशी असलेला संवाद पाहता ते विजयाबाबत कमालीचे आश्वस्त असल्याचे जाणवत होते.

भारतीय जनता पक्षासारख्या सत्ताधारी आणि बलाढ्य राजकीय शक्तीविरुद्ध तुलनेने प्रतिकूल परिस्थितीत एकाकी झुंज देत विजयाच्या समीप पोहोचणे ही साधी बाब नाही. मात्र ही लढाई केवळ उमेदवाराची न राहता खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाची बनली. राजकीय अडचणी, पक्षांतर्गत आव्हाने आणि अंकगणितातील प्रतिकूलता यांवर मात करत त्यांनी विजयाची आशा कायम ठेवली.

मतदारांनी नेमके कोणाच्या पारड्यात मतदान टाकले आहे, याचा निकाल २२ तारखेला स्पष्ट होईल. मात्र निकाल काहीही लागो, या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. अनेकांच्या मते, अधिकृत निकाल येण्यापूर्वीच त्यांनी राजकीयदृष्ट्या ही निवडणूक जिंकली आहे. कारण निवडणूक केवळ मतांची नसते, ती नेतृत्वाची, संघर्षाची आणि जनमानसात निर्माण होणाऱ्या विश्वासाचीही असते. आणि या तिन्ही आघाड्यांवर खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!