पाणी आणण्यास सांगितले, शेळ्या-बोकड लंपास केले! ; तांबव्यातील घटनेची वृद्ध महिलेकडून अकलूज पोलिसात तक्रार

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : तांबवे शिवारातील शेतात चरण्यासाठी बांधलेल्या तीन शेळ्या आणि एका बोकडाची मिळून ३२ हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. पाणी आणण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेची नजर चुकवून अज्ञात इसमाने पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिगो मांझा कारमधून शेळ्या-बोकड चोरून नेल्याची तक्रार अकलूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सुशीला चंद्रकांत भोसले (वय ६५, रा. २५/४, हनुमान हायस्कूलसमोर, लवंग, ता. माळशिरस) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास सुशीला भोसले या तांबवे शिवारातील जे. के. नाना चव्हाण यांच्या शेतात असताना अज्ञात इसम पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिगो मांझा कारमधून तेथे आला. त्याने भोसले यांना पाणी आणून देण्यास सांगितले. त्यानुसार त्या पाणी आणण्यासाठी गेल्या असता, त्यांची नजर चुकवून अज्ञात इसमाने तीन काळ्या रंगाच्या गावठी शेळ्या व एक काळ्या रंगाचा सुमारे एक वर्ष वयाचा बोकड त्यांच्या संमतीशिवाय लबाडीने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या शेळ्यांची अंदाजे किंमत २४ हजार रुपये, तर बोकडाची किंमत ८ हजार रुपये, अशी एकूण ३२ हजार रुपयांची किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 303(2) अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याला अटक झालेली नाही.
दरम्यान, चोरीसाठी वापरण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिगो मांझा कारचा तपास तसेच परिसरातील संभाव्य हालचालींच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल माने-देशमुख करीत आहेत.



