महाप्रसादाच्या आयोजनावर FDA चा दणका ; नोंदणीशिवाय कार्यक्रम केल्यास कारवाईचा इशारा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळे आणि आयोजकांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, जेवणावळी तसेच अन्नवाटपाच्या कार्यक्रमांसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) नोंदणी व आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. नोंदणी व परवानगी न घेता महाप्रसादाचे आयोजन केल्यास संबंधित आयोजकांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद व जेवणावळींची अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
महाप्रसाद किंवा जेवणावळीचे आयोजन करणाऱ्या गणेश मंडळांनी festivals.mahafda.in या संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरून FDA नोंदणी व परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रियेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाप्रसाद तयार करताना स्वच्छता, अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक, स्वच्छ पाण्याचा वापर, स्वयंपाकाची जागा स्वच्छ ठेवणे तसेच अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींची वैयक्तिक स्वच्छता याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता किंवा अन्नसुरक्षा नियमांचा भंग आढळून आल्यास संबंधित आयोजकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
याबाबत सहाय्यक आयुक्त डॉ. मंगेश लवटे यांनी गणेश मंडळे व आयोजकांनी महाप्रसाद किंवा जेवणावळींचे आयोजन करण्यापूर्वी आवश्यक FDA नोंदणी व परवानगी घेऊन अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. महाप्रसादाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी आयोजकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करूनच अन्नवाटपाचे कार्यक्रम आयोजित करावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गणेश मंडळांना विशेष आवाहन : गणेशोत्सवाच्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद व जेवणावळींसाठी FDA नोंदणी व आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरक्षित आणि स्वच्छ महाप्रसादाचे आयोजन करणे ही आयोजकांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून आवश्यक नोंदणी व परवानगी घ्यावी. — डॉ. मंगेश लवटे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर



