खळबळजनक बातमी ! माळशिरस तालुक्यात आधार कार्डचा मोठा खेळ ; सिम कार्ड, बँक खाते, ऑनलाईन कर्ज…?तब्बल 300 जणांची फसवणूक

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
नातेपुते : रेशन दुकानदार असल्याचा फायदा घेत नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या आधारकार्डसह वैयक्तिक माहितीचा कथित गैरवापर करून सीमकार्ड, बँक खाती व पेमेंट अॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर प्रकार माळशिरस तालुक्यातील फडतरी, लोणंद व लोंढे-मोहितेवाडी परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी जवळपास 300 नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून, नातेपुते पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण मधुकर ननवरे (वय 24, रा. शिवारवस्ती, फडतरी, ता. माळशिरस) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, जून 2026 पासून 2 सप्टेंबर 2026 पर्यंत मौजे लोंढे-मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. रेशन दुकानदार वर्धमान उर्फ लाला वसगडेकर (वय 45, रा. नातेपुते) याने रेशन दुकानदार असल्याचा फायदा घेत आपल्या परिचयातील प्रशांत पांडुरंग साठे (वय 48, रा. दौंड, जि. पुणे), ईश्वर शेट्टी (वय 50, रा. चौफुला, जि. पुणे), हरिराम काशिनाथ जाधव (वय 49, रा. गिरीम-जाधववाडी, जि. पुणे), ऋषभ बाळासाहेब मोहिते (वय 35, रा. लोंढे-मोहितेवाडी, ता. माळशिरस), दत्ता शिंदे (वय 37, रा. गिरवी, ता. माळशिरस), दादा निंबाळकर (वय 40, रा. येळीव-सदाशिवनगर, ता. माळशिरस) आणि वैभव शिंदे (वय 38, रा. येळीव-सदाशिवनगर, ता. माळशिरस) यांच्या मदतीने नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, नागरिकांच्या वैयक्तिक व गोपनीय माहितीचा वापर करून त्यांच्या आधारकार्डाच्या आधारे अंगठ्याचे ठसे, जैवमितीय माहिती तसेच चेहर्याची ओळख यांचा कथित वापर करण्यात आला. त्यानंतर डिजिटल स्वरूपातील बनावट कागदपत्रे तयार करून आधारकार्डवर एकवेळचा संकेतांक मिळविण्यासाठी व्हीआय, एअरटेल आणि जिओ कंपनीची सीमकार्डे घेतल्याचा आरोप आहे. तसेच विविध पेमेंट अॅपच्या माध्यमातून बँक खाती उघडून ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे आणि नागरिकांच्या नावावर ऑनलाइन वित्तीय संस्थांकडून कर्ज काढण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारातून फिर्यादीसह फडतरी, लोणंद आणि लोंढे-मोहितेवाडी परिसरातील जवळपास 300 नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांच्या आधारकार्डाचा आणि जैवमितीय माहितीचा अशा प्रकारे कथित गैरवापर झाल्याच्या आरोपामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नेमकी किती नागरिकांची माहिती वापरण्यात आली, त्यांच्या नावावर किती सीमकार्ड व बँक खाती काढण्यात आली तसेच ऑनलाइन व्यवहार आणि कर्जाच्या माध्यमातून किती रकमेचा गैरव्यवहार झाला, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.
नातेपुते पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 3(5), 316(2), 318(4), 336(2), 336(3), 337, 338, 339 व 340 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 65 व 66 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील वर्धमान उर्फ लाला वसगडेकर, प्रशांत पांडुरंग साठे, हरिराम काशिनाथ जाधव आणि ऋषभ बाळासाहेब मोहिते यांना अटक करण्यात आली असून ईश्वर शेट्टी, दत्ता शिंदे, दादा निंबाळकर आणि वैभव शिंदे यांना अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती पोलिस नोंदीनुसार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विशाल नवले, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, माळशिरस हे करीत आहेत.



