लवंग येथे मध्यरात्री घराच्या पोर्चमध्ये चोरी; आई-आजीच्या गळ्यातील सोन्याचे मणी, कर्णफुले लंपास

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यातील लवंग येथे घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या महिला आणि वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रणजीत राजेंद्र चव्हाण (वय २७, रा. लवंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये त्यांची आई व आजी झोपल्या होत्या. त्यावेळी चार अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले. चोरट्यांनी दोघींच्या गळ्यातील सोन्याचे मणी तसेच आईच्या कानातील सोन्याची कर्णफुले जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि तेथून पलायन केले.
चोरी केल्यानंतर अज्ञात चोरटे दोन मोटारसायकलींवरून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे कर्णफुले आणि ३० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे गळ्यातील मणी, असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात BNS कलम 3(5) व 304(2) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांची नावे, पत्ते व इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल रणनवरे करीत आहेत.



