Uncategorized

FDA माळशिरस तालुक्यात सक्रिय; आठवडाभरात दुसऱ्यांदा अकलूजमधील नामांकित हॉटेलवर कारवाई

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : गणेशोत्सव व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने माळशिरस तालुक्यात धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत अकलूज येथील मे. अभिनव स्नॅक्स, जयसिंह चौक, बायपास रोड या आस्थापनेची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापनेस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गणेशोत्सव व आगामी सणासुदीच्या काळात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे अथवा अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. अन्नपदार्थांची साठवणूक, परिसरातील स्वच्छता, खाद्यतेलाचा वापर, खाद्यरंग तसेच इतर अन्नघटकांची गुणवत्ता याबाबत तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने माळशिरस तालुक्यात तपासणीची मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसून येत आहे. आठवडाभरात अकलूजमधील दुसऱ्या नामांकित हॉटेल/अन्न आस्थापनेवर कारवाई झाल्याने अन्न व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न आस्थापनांवर प्रशासनाची नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी केली.

अन्न व औषध प्रशासनाकडून आगामी काळातही अन्न आस्थापनांची तपासणी सुरू राहणार आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. सा. ए. देसाई यांनी केले आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button