FDAची कारवाई चुकीची की हॉटेलचे स्पष्टीकरण चुकीचे?; नेमकं बरोबर कोणाचं? FDAच्या कारवाईनंतर ‘अभिनव अमृततुल्य’चे स्पष्टीकरण व्हायरल

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : गणेशोत्सव व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अकलूजमधील मे. अभिनव स्नॅक्स या आस्थापनेची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने घेतले. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने संबंधित आस्थापनेला तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. या कारवाईनंतर महर्षि डिजिटल न्यूजने ‘FDA माळशिरस तालुक्यात सक्रिय; आठवडाभरात दुसऱ्यांदा अकलूजमधील नामांकित हॉटेलवर कारवाई’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
मात्र, या वृत्तानंतर अभिनव अमृततुल्यच्या वतीने एक स्पष्टीकरण पत्रक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या पत्रकात हॉटेल व्यवस्थापनाने प्रशासनाकडून तपासणी झाल्याचे मान्य केले असून, काही सूचना करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र ‘हॉटेल बंद करण्यास सांगितलेले नाही; संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आला आहे,’ असा दावा करण्यात आला आहे.
याच स्पष्टीकरण पत्रकात सोशल मीडियावर ‘अभिनव अमृततुल्य हॉटेल बंद करण्यात येत आहे’ अशा आशयाचे संदेश फिरत असल्याचे नमूद करून, असे संदेश चुकीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, महर्षि डिजिटल न्यूजने प्रसिद्ध केलेली बातमी ही FDAकडून प्राप्त झालेल्या कारवाईच्या माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आली होती. FDAच्या माहितीनुसार तपासणी, अन्न नमुने घेणे आणि त्रुटींच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे नमूद होते.
मात्र, आता हॉटेल व्यवस्थापनाकडून ‘व्यवसाय बंद करण्याचा आदेश नसून, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे’ असा दावा करण्यात आल्याने या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एका बाजूला FDAची अधिकृत कारवाई आणि त्यानुसार प्रसिद्ध झालेली वृत्ते, तर दुसऱ्या बाजूला अभिनव अमृततुल्यचे स्पष्टीकरण पत्रक आहे. त्यामुळे FDAने दिलेले आदेश नेमके कोणत्या स्वरूपाचे होते? ‘व्यवसाय बंद’ हा निर्देश होता की त्रुटी दूर करण्यासाठी दिलेली सूचना होती? याचे अधिकृत दस्तऐवज किंवा आदेश स्पष्ट झाल्यानंतरच या वादावर अंतिम पडदा पडू शकतो.
विशेष म्हणजे, अभिनव अमृततुल्यच्या पत्रकात प्रशासनाने इतर ठिकाणीही अशाच प्रकारे तपासणी करावी, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता आणि खाद्यसुरक्षेच्या नियमांचे पालन याबाबतही प्रशासनाने समान निकषाने कारवाई करावी, अशी भूमिका त्यातून मांडण्यात आली आहे.
त्यामुळे सध्या ‘FDAची कारवाई चुकीची की हॉटेलचे स्पष्टीकरण?’ यापेक्षा ‘अधिकृत आदेशात नेमके काय नमूद आहे?’ हा या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरतो.



