कचरेवाडीतील खडीक्रशरवर कामगाराचा मृत्यू, सर्व नियम पायदळी तुडवून राजरोसपणे व्यवसाय सुरू ; प्रशासनाला अजून किती बळी हवेत? नागरिकांचा सवाल

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी परिसरातील खडीक्रशरवर लोखंडी हॉपर अंगावर पडून २२ वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे कचरेवाडी परिसरातील अवैध उत्खनन आणि खडीक्रशरचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मृत कामगाराचे नाव दालिम हफीजूल शेख (वय २२, रा. लक्ष्मीपूर, ता. लखीमपूर, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) असे असून, तो सध्या कचरेवाडी येथील घाणीचा पूल परिसरात राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दालिम शेख हा खडीक्रशरवरील मशीन सुरू करण्यासाठी गेला होता. त्यावेळी खडीने भरलेला लोखंडी हॉपर अचानक तुटून त्याच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी माळशिरस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोहेकॉ सलीम फकीर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडीक्रशर मालक महादेव गोपाळ देशमुख (वय ४०, रा. माळशिरस) यांच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, खडीक्रशरचा हॉपर गंजलेला व तुटलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मालकाला असतानाही त्याची दुरुस्ती करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी बूट, ग्लोव्हज, सेफ्टी बेल्ट आणि प्राथमिक उपचार पेटी उपलब्ध करून न दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय क्रशर मशीनच्या देखभालीचे रजिस्टर, फिटनेस सर्टिफिकेट आणि सेफ्टी ऑडिट रिपोर्ट उपलब्ध नसल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या निष्काळजीपणामुळे हॉपर कामगाराच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, कचरेवाडी परिसरातील अवैध उत्खनन, खडी-मुरूम उत्खनन आणि खडीक्रशरच्या कारभाराबाबत महर्षि डिजीटल न्यूजने यापूर्वी सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. या वृत्तमालिकेत परिसरातील उत्खननामुळे निर्माण होणारे प्रश्न, वाहतूक, रस्त्यांची होणारी दुरवस्था तसेच प्रशासनाच्या भूमिकेबाबत मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.
आता याच परिसरातील खडीक्रशरवर काम करणाऱ्या कामगाराचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याने कचरेवाडी परिसरातील खडीक्रशर, त्यांची सुरक्षितता आणि उत्खननाच्या नियमांचे पालन याबाबत प्रशासनाकडून गांभीर्याने तपासणी होणार का? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम 106(1), 125(a) आणि 125(b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक भगत करीत आहेत.



