Latest News

‘हर हर महादेव’च्या जयघोषाने शंकरनगर दुमदुमले; शिवपार्वती महाआरतीला हजारोंची गर्दी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात  

अकलूज : अकलूज येथील महाशिवरात्र यात्रा समिती चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर यांच्या वतीने पवित्र श्रावण मासाच्या समाप्तीनिमित्त सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता शंकरनगर येथील श्री शिवपार्वती मंदिरात भव्य महाआरती उत्साहात संपन्न झाली. यावेळी माळशिरस तालुक्यासह परिसरातील सुमारे १४ ते १५ हजार भाविक उपस्थित होते.

श्रावण महिनाभर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अखंड नामजप, शिवलीलामृत ग्रंथवाचन, हरिपाठ तसेच प्रत्येक सोमवारी लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. नागपंचमी सणानिमित्त श्री शिवपार्वती मंदिर परिसरात दोन दिवस सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या विविध पारंपरिक खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना महिलांचा व मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो महिला व मुलींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत विविध खेळांचा आनंद घेतला.

श्रावण मासाच्या समाप्तीनिमित्त सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री शिवपार्वती मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर ‘हर हर महादेव, पार्वती शंकर सदाशिवा’ या नामजपाने मंदिर परिसर भक्तिमय झाला. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच शोभेच्या दारूकामाचे आकर्षक देखावे सादर करण्यात आले आणि तोफांची आतषबाजी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, महाशिवरात्र यात्रा समितीचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, त्यांच्या पत्नी सौ. सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, त्यांच्या पत्नी सौ. कांचनमालादेवी मदनसिंह मोहिते-पाटील, स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव रामचंद्र माने-देशमुख, संचालक मंडळ तसेच परिसरातील पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रावण महिनाभर आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शंकरनगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रावण समाप्तीच्या महाआरतीला मिळालेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा या धार्मिक उपक्रमांचे वैशिष्ट्य ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button