देशाच्या जलभविष्यावर मुन्नारमध्ये मोठी चर्चा; संसदीय समितीच्या बैठकीत खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सहभाग

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलामुळे निर्माण होत असलेली जलसंकटाची आव्हाने आणि भविष्यातील जलसुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांवर केरळ राज्यातील मुन्नार येथे आज संसदेच्या जल संसाधन विषयक स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष मा. खासदार राजीव प्रताप रूडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समितीचे सदस्य खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध विषयांवर चर्चा केली.
बैठकीत केरळमधील जलस्रोत व्यवस्थापन, पाणीटंचाई, भूजल पातळीतील घट, हवामान बदलामुळे पर्जन्यमान व तापमानात होत असलेले बदल, पूर नियंत्रणाची यंत्रणा तसेच वाढती लोकसंख्या आणि पर्यटन क्षेत्रामुळे वाढणाऱ्या पाण्याच्या गरजेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सखोल आढावा घेण्यात आला.
यावेळी राज्यातील महत्त्वाच्या इडुक्की धरणाच्या व्यवस्थापन, सुरक्षितता, धरणात साचणारा गाळ (सिल्टेशन) आणि पूर नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. तसेच धरणाच्या कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम (CADWM) अंतर्गत कालवा विकास, सिंचन कार्यक्षमता आणि जल व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा आढावाही समितीने घेतला.
बैठकीत जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन जल नियोजन आणि भविष्यातील पाणी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसेच जलस्रोतांचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि भविष्यातील जलसुरक्षेसाठी प्रभावी धोरणे राबविण्याबाबत विविध सूचना करण्यात आल्या.
या बैठकीत समितीचे सदस्य म्हणून खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उपस्थित राहून जलसंपत्तीच्या प्रभावी व्यवस्थापनासंदर्भातील चर्चेत सहभाग घेतला. देशातील जलसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी अशा बैठका महत्त्वपूर्ण ठरत असून, भविष्यातील जलधोरण निश्चित करण्यात या चर्चेचा उपयोग होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



