Latest News

शाळेत जाणाऱ्या १३ वर्षीय मुलीला ऊसाच्या शेतात ओढण्याचा प्रयत्न;  नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : शाळेत जाणाऱ्या एका १३ वर्षांच्या निष्पाप विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून, तिचा विनयभंग करत तिला जबरदस्तीने ऊसाच्या शेतात ओढून नेण्याचा धक्कादायक प्रकार श्रीपूर (ता. माळशिरस) येथे घडला आहे. बुधवारी (दि. २४ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास महाळुंग मायनर परिसरात ही घटना घडली. मात्र, मुलीने दाखवलेले प्रसंगावधान आणि शाळा प्रशासनाची तत्परता यामुळे नराधम आरोपी जीवन घाडगे याच्या काही तासांतच अकलूज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलगी ही श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालयात शिकत आहे. बुधवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे महाळुंग मायनर ते श्रीपूर रस्त्याने पायी शाळेत जात होती. दरम्यान, आरोपी जीवन जयंत घाडगे (रा. मायनर महाळुंग) हा दुचाकीवरून तिच्या मागे आला. त्याने गाडी आडवी मारून मुलीला बोलण्याच्या बहाण्याने थांबवले.

 “मला शाळेला उशीर होतोय,” असे सांगत मुलीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण, नराधम जीवनने तिला धमकावत जबरदस्तीने रोखले. तिच्या खांद्यावर हात ठेवून अश्लील वक्तव्य केले आणि तिला रस्त्याशेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात ओढू लागला.

या भयानक प्रसंगाने मुलगी घाबरली, पण तिने हिंमत हारली नाही. तिने जीवाच्या आकांताने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि पळत घर गाठले. घरात हा प्रकार सांगितल्यानंतर ती शाळेत गेली आणि तिने थेट मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे यांना घडलेली आपबीती सांगितली.

घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापक बनसोडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुलीच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले. शाळा प्रशासनाने पीडितेला धीर दिला आणि थेट अकलूजचे ‘निर्भया पथक’ व अकलूज पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक नीरज उबाळे ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांनी तात्काळ आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले.

 निर्भया पथकाच्या प्रमुख पीएसआय करिष्मा वनवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे, टेंगले यांच्या नेतृत्वात पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी रात्रीतूनच महाळुंग मायनर परिसरात शोधमोहीम राबवली. पहाट उजाडण्याच्या आत आरोपी जीवन घाडगे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

अकलूज पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजि. नंबर ०४५४ अन्वये नवीन कायद्यानुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७४, ७५, ३५१(२) आणि पॉक्सो (POCSO) कायदा कलम ४ व १२ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वनवे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!