माळशिरस वकील संघटना व विधी सेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
माळशिरस : संविधान हा केवळ कायद्याचा ग्रंथ नसून प्रत्येक भारतीयाच्या जीवनाला दिशा देणारा मूलभूत दस्तऐवज आहे. संविधानाने दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावीत आणि संविधानाला आपल्या जीवनाची आचारसंहिता बनवावे, असे आवाहन माळशिरस येथील न्यायाधीश श्री. उमेश पेठे यांनी केले.
माळशिरस वकील संघटना आणि विधी सेवा फाउंडेशन, माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनानिमित्त माळशिरस न्यायालयाच्या बार रूममध्ये आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोपान घनवट, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर भास्कर गोरे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमेश पेठे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राजेंद्र शिंदे, माळशिरस वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सत्यजीत गलांडे यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ, वकील बंधू-भगिनी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. विधी सेवा फाउंडेशनचे सचिव ॲड. सुमित सावंत यांनी प्रास्ताविकातून संविधान दिन साजरा करण्यामागील भूमिका आणि संविधानिक मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष ॲड. भारत गोरवे यांनी मनोगत व्यक्त करत संविधानिक विचारांची समाजात रुजवणूक होण्याची गरज अधोरेखित केली.
प्रमुख वक्ते न्यायाधीश उमेश पेठे यांनी आपल्या मार्गदर्शनातून संविधानातील मूलभूत मूल्यांचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट केला. संविधानातील तत्त्वे केवळ पुस्तकात किंवा कार्यक्रमांपुरती मर्यादित न राहता ती आपल्या विचारांत, वर्तनात आणि कृतीत प्रतिबिंबित झाली पाहिजेत, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळशिरस वकील संघटनेचे सचिव ॲड. दत्तात्रय आडत यांनी केले, तर अध्यक्ष ॲड. सत्यजीत गलांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
संविधानाचा सन्मान म्हणजे लोकशाहीचा सन्मान आणि संविधानिक मूल्यांचे आचरण म्हणजे सशक्त समाजनिर्मितीच्या दिशेने टाकलेले पाऊल! या विचाराने कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.

