जिल्ह्याचा स्वाभिमान आणि पुरोगामी विचारांच्या रक्षणासाठी मोहिते पाटलांचा संघर्ष; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा कसोटी

महर्षि डिजिटल न्यूज | सागर खरात
अकलूज : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून स्वाभिमान, सहकार आणि पुरोगामी विचारांची लढाई केंद्रस्थानी आली आहे. या लढाईत मोहिते-पाटील परिवाराने लोकसभा निवडणुकीपासूनच संघर्षाची भूमिका घेतली असून, प्रत्येक निवडणुकीत आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेची ताकद, आर्थिक बळ आणि शासकीय यंत्रणेचा प्रभाव अशा प्रतिकूल परिस्थितीतही मतदारांच्या मनातील स्वाभिमान जागृत करून राजकीय समीकरणे बदलण्याची किमया मोहिते-पाटील गटाने अनेकदा साधली आहे. आता हाच स्वाभिमान आणि पुरोगामी विचारांचा मुद्दा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असो किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघाची, मोहिते-पाटील परिवाराने या निवडणुका केवळ राजकीय प्रतिष्ठेच्या न ठेवता जिल्ह्याच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून पुढे आणल्या. तत्कालीन सत्ताधाऱ्यांचे राजकीय बळ, आर्थिक ताकद आणि प्रशासकीय यंत्रणेचा प्रभाव असतानाही भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या निकालांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलण्याबरोबरच मतदारांची मानसिकताही बदलल्याचे चित्र निर्माण केले.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकीय चित्र एका बाजूला असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र वेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निकालांचा कल असतानाही जिल्ह्यातील काही मतदारसंघांत वेगळे चित्र निर्माण करण्यात मोहिते-पाटील गटाला यश आले. यातून जिल्ह्यातील राजकीय मतप्रवाह स्वतंत्र असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
त्यानंतर नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणातही या गटाने आपली संघटनात्मक ताकद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नसले, तरी माळशिरस तालुक्यातील राजकीय वर्चस्व कायम राखण्यात त्यांना यश आले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांमधील प्रभाव अद्यापही टिकून असल्याचे स्पष्ट झाले.
मोहिते-पाटील गटाच्या राजकीय ताकदीची आणखी एक परीक्षा विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळाली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील गटाकडे केवळ १६ मते असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जात होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक मते मिळवून या गटाने विरोधकांच्या दाव्यांना उत्तर दिले. संख्याबळाबाबत केले जाणारे दावे आणि प्रत्यक्ष मतदारांचा कौल यामध्ये किती अंतर असू शकते, हे या निवडणुकीतून समोर आले.
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महत्त्वाची ठरत आहे. वास्तविक, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मोहिते-पाटील गटाकडून प्रयत्न करण्यात आले. सहकार क्षेत्रातील संस्थांचे हित, बँकेची स्थिरता आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने निवडणूक बिनविरोध होणे योग्य ठरले असते. मात्र, जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील स्थानिक परिस्थिती आणि राजकीय समीकरणांची पुरेशी जाण नसलेल्या बाहेरील नेतेमंडळींच्या हस्तक्षेपामुळे निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होऊ शकली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
मोहिते-पाटील परिवाराने लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने स्वाभिमानाचा मुद्दा पुढे आणला, त्याच भूमिकेतून आता जिल्हा बँकेची निवडणूक लढवली जात आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला मतदार कितपत साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या स्वाभिमानाच्या राजकीय प्रवासाला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा निर्णायक वळण मिळणार आहे. यापूर्वी मतदारांनी मोहिते-पाटील परिवाराच्या नेतृत्वाला दिलेली साथ यावेळीही कायम राहणार का, की सत्ताधारी भाजप आपली ताकद सिद्ध करणार, याचे उत्तर मतदानानंतरच मिळेल. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमान, सहकार आणि पुरोगामी विचारांची लढाई पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे, हे निश्चित.



