कोळेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची 81 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : कोळेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची सन 2024-2025 या आर्थिक वर्षाची 81 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन नितीन सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेची प्रगतीशील कामगिरी उलगडून दाखवत सभेत सादर केलेल्या अहवालानुसार, आज अखेर संस्थेचे एकूण सभासद 1362 असून, त्यापैकी 451 सभासदांनी कर्ज सुविधा घेतली आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल 4 कोटी 79 लाख 40 हजार 460 रुपये इतकी झाली आहे. तर 31 मार्च 2025 अखेर संस्थेला निव्वळ नफा 13 लाख 3 हजार 21 रुपये 20 पैसे झाला असल्याची माहिती देण्यात आली.
सभासदांचा विश्वास व संस्थेची सातत्याने वाढती प्रगती यांचा विचार करून चेअरमन नितीन सावंत यांनी सभेत सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. या निर्णयाचे स्वागत उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात केले.
सभेला धनंजय जनार्धन दुपडे, बाबासाहेब सावंत, नागनाथ दुपडे, ज्ञानेश्वर सावंत, अधिकराव सावंत, ॲड. नवनाथ सावंत, ॲड. धनंजय दुपडे यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद तसेच आजी-माजी सरपंच, चेअरमन व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेची सुरुवात श्रद्धांजली ठरावाने झाली. हा ठराव संचालक पोपट सावंत यांनी मांडला. विषयवाचन सचिव नवनाथ पारसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल बेंदगुडे (व्हाईस चेअरमन) यांनी मानले.
संस्थेची कामगिरी आणि सभासदांच्या हितासाठी घेतलेले निर्णय यामुळे कोळेगाव सेवा संस्थेची सभा अत्यंत यशस्वी आणि समाधानकारक ठरल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली.



