मानवतेच्या शिकवणीने उजळलं अकलूज : पैगंबर जयंती उत्साहात साजरी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : “अमन-शांती, समता-बंधुता आणि मानवतेचा संदेश जगभर पसरविणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची १५०० वी जयंती (ईद मिलादुन्नबी) अकलूजमध्ये भव्य शोभायात्रा व उत्साहपूर्ण कार्यक्रमांनी साजरी झाली. नारे-तकबीर, नारे-रिसालताच्या घोषणांनी वातावरण भारून गेले आणि शहर भक्तीभाव, श्रद्धा आणि ऐक्याच्या रंगात न्हाऊन निघाले.”
काझीमोहल्ला येथून निघालेल्या या शोभायात्रेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. नगरपरिषद कार्यालय, हनुमान मंदिर, आंबेडकर चौक, जुने पोलीस स्टेशन, विजय चौक अशा मार्गाने ही मिरवणूक निघाली. अखेरीस कौलारू शाळेत सांगता होऊन नातखानी व पैगंबरांच्या जीवनदर्शनावर प्रवचनांनी सर्वांचे मनोमंथन केले.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हजरत मोहम्मद पैगंबरांचा अमन आणि बंधुत्वाचा संदेश आजच्या काळासाठी दीपस्तंभ आहे. समाजाच्या प्रेमाचा मी ऋणी असून त्यांच्या प्रगतीसाठी नेहमी कटिबद्ध राहीन.”

जामा मस्जिद बागवान गल्लीचे इमाम यांनी पैगंबरांच्या जीवनातील त्याग, करुणा व समानतेचा संदेश अधोरेखित केला.
कार्यक्रमाला अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, जि. प. माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, धनंजय देशमुख, सयाजीराजे मोहिते पाटील, अभिजीत माने पाटील, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
ईद मिलादुन्नबीच्या सोहळ्यामुळे अकलूजमध्ये श्रद्धा, प्रेम आणि ऐक्याचा संदेश पसरला. शहराचे वातावरण शांती, मानवता आणि एकतेच्या दिव्य प्रकाशाने उजळून निघाले.



